इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:19 PM2020-05-23T20:19:53+5:302020-05-23T20:20:01+5:30
दोन कामगार गंभीर तर तिघे किरकोळ जखमी
नागपूर - कोंढाळी : शिवा सावंगा येथील इकॉनामिक एक्सप्लोसि कंपनीत शनिवारी सायंकाळी ५ वाजता डिटोनेटरचे उत्पादन करताना स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या स्फोटात अन्य तिन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.
कोंढाळी पासुन १५ कि.मी अंतरावर शिवा सावंगा येथे इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे. ही कंपनी डिटोनेटर व देशाच्या संरक्षण विभागाकरिता स्फोटकांचे उत्पादन करते. शनिवारी कंपनीच्या डी-५ भागात डिटोनेटरची फिलिंग केली जात असताना स्फोट झाला. या स्फोटात दत्तु बागडे (५१),भुषण देव्हारे (२३), प्रितेश जयतगुडे (२०) सर्व रा.शिवा येथे तिघे गंभीर जखमी झाले. यासोबतच भूषण पुंड (२३) रा. बाजारगाव, निलेश उके (३६), मुरली मुकेश धुर्वे (२१) रा.सावंगा हे तिघे किरकोळ जखमी झाले. या सर्वांना कंपनीच्या रुग्णवाहिकेने नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उपचारादरम्यान प्रितेश जयतगुडे (२०) याचा मृत्यू झाला. यासोबतच भुषण देव्हारे आणि दत्तू बागडे या दोघांची प्र्रकृती चिंताजनक आहे.
डी-५ या विभागात एकुण २९ कामगार डिटोनेटर फिलिंगचे काम करीत होते. तेव्हा हा स्फोट झाला. या स्फोटात डी-५ भागाचे मोठे नुकसान झाले. कंपनीने तातडीने हा भाग सुरक्षेकरीता बंद केला. कारण स्फोटा नंतर डिटोनेटर सर्वत्र विखुरले असल्याने पुन्हा स्फोटांचा धोका होता. घटनेची माहिती मिळताच काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने घटनास्थळी दाखल झाले.