नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:15 AM2018-04-10T10:15:16+5:302018-04-10T10:15:28+5:30
नोकरीचे आमिष दाखवून सायबर टोळीने एका तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून सायबर टोळीने एका तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला.
निशान अहमद मकबुल अहमद अंबर (वय २७) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोमिनपुऱ्यात राहतो. त्याने गेल्या वर्षी नोकरीसाठी आपली शैक्षणिक व इतर माहिती (रिझ्यूम) वेगवेगळ्या संकेतस्थळावर अपलोड केली होती. २९ सप्टेंबर २०१७ ला निशानला ९५४०२९९७३५ तसेच ९८९१६७६४९३ या क्रमांकावरून एका महिलेचे फोन आले. आपण अप्लाय नोकरी डॉट ईनमधून बोलतो, असे म्हणून त्या महिलेने निशानला बिर्ला कंपनीत रिक्त जागा असून, तेथे मुलाखतीसाठी आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. यावेळी महिलेने निशानचा दुसरा मोबाईल क्रमांकही मागून घेतला. त्यानंतर १०० रुपये आॅनलाईन रजिस्ट्रेशन चार्ज आपल्या खात्यात जमा करायला लावले आणि त्या आधारे निशानच्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतले. या प्रकरणाची तक्रार निशानने तहसील पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.