नागपुरात एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 08:29 PM2019-01-02T20:29:12+5:302019-01-02T20:35:32+5:30
शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ताधारकांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरही प्लॉटधारक न सापडल्यास थकबाकी असलेले प्लॉट जप्त करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ताधारकांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरही प्लॉटधारक न सापडल्यास थकबाकी असलेले प्लॉट जप्त करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.
२०१८-१९ या वर्षात मालमत्ता करापासून ५०९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. डिसेंबर अखेरीस १४० कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुली २५ कोटींनी अधिक असली तरी वित्त वर्षातील उद्दिष्ट विचारात घेता ती कमी आहे. आर्थिक वर्ष संपायला आता तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कर वसुलीसाठी तातडीने बैठकी घेण्याचे निर्देश दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोनच्या आढावा बैठका घेतल्या पाहिजे. सध्या दररोज २.४० कोटींच्या आसपास कर वसुली होत आहे. शिल्लक कालावधी विचारात घेता ती कमी आहे. दररोज ३.५० ते ४ कोटींची वसुली झाली तरच उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. वसुलीत सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.
थकबाकीदारांच्या घरापुढे नगारा वाजविणार
मालमत्ता कराच्या ३०० कोटींच्या थकबाकीपैकी ३३ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसुली व्हावी, यासाठी वसुली मोहीम राबविली जाणार आहे. यापूर्वी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरापुढे नगारा वाजविण्यात आला होता. गरज भासल्यास पुन्हा नगारा वाजविला जाईल. अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
मे पर्यंत एक लाख एलईडी लावणार
डिसेंबर महिन्यात १६५०० एलईडी लावण्यात आले. जानेवारी महिन्यात २३ हजार एलईडी लावले जातील. फेब्रुवारीत १८ हजार तर मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी २० हजार असे एकूण १ लाख एलईडी लावण्यात येतील. असे निर्देश महापालिकेच्या विद्युत विभागाला दिल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
बाजार विभागाही वसुलीत मागेच
बाजार विभागाने १३.७५ कोटींच्या डिमांड पाठविल्या आहेत. डिसेंबर अखेरीस विभागाची वसुली ४.२१ कोटींची झाली आहे. विभागाची वसुली कमी आहे. वसुलीत वाढ व्हावी. यासाठी दर महिन्याला आढावा घेतला जात आहे.