एटीएममधून एक लाख रुपये लंपास
By admin | Published: November 6, 2016 04:28 PM2016-11-06T16:28:53+5:302016-11-06T16:28:53+5:30
एटीएममधून पैसे काढून देण्याची बतावणी करून अनोळखी आरोपीने एका व्यक्तीचे एटीएम कार्ड लंपास केले. नंतर त्या कार्डचा वापर करून एक लाख रुपये काढून घेतले.
Next
> ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 6 - एटीएममधून पैसे काढून देण्याची बतावणी करून अनोळखी आरोपीने एका व्यक्तीचे एटीएम कार्ड लंपास केले. नंतर त्या कार्डचा वापर करून एक लाख रुपये काढून घेतले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मानेवाडा, मित्रनगर येथील राजेंद्र भाऊराव पन्नासे (५५) हे २२ आॅक्टोबरला मानेवाडा चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना त्यावेळी एटीएममधून पैसे काढणे जमले नाही. त्यामुळे ते बाहेर निघाले. बाजुलाच एक आरोपी उभा होता. त्याने एटीएममधून रक्कम कशी काढायची, ते सांगतो म्हणत पन्नासे यांच्या हातातील एटीएम कार्ड घेतले. पासवर्ड विचारला. पन्नासे यांना हवी असलेली रक्कम काढून दिली. नंतर दुसरेच एक एटीएमकार्ड पन्नासे यांच्या हातात दिले. काही दिवसानंतर पन्नासे यांनी पुन्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते एटीएमकार्ड मशीन स्वीकारत नव्हती. त्यामुळे त्यांनी बँक अधिका-यांशी संपर्क केला. यावेळी बँकेने त्यांना दिलेले हे कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरे म्हणजे, त्या आरोपीने पन्नासे यांच्या कार्डचा वापर करून त्यांच्या पत्नीच्या खात्यातून २२ ते २३ आॅक्टोबर दरम्यान १ लाख, ३३१३ रुपये काढून घेतल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पन्नासे यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक पी. एम. लाकडे यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.