नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:50 PM2020-06-19T19:50:50+5:302020-06-19T19:52:27+5:30
पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले. २ मार्चला घडलेल्या या सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर गुरुवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
विक्रांत विजय टाले, रा. सिव्हिल लाईन्स असे तक्रारदाराचे नाव आहे. टाले हे न्यायालयात कर्मचारी असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. नोकरीच्या वेळेनंतर पार्टटाईम जॉब करून आर्थिक स्थिती चांगली बनवण्यासाठी त्यांनी स्वत:चा आणि आपल्या पत्नीचा अॅप्लिकेशन वजा रिझ्यूम नोकरी डॉट कॉम वर अपलोड केला होता. २ मार्चला त्यांना सागर सक्सेना नामक आरोपीने फोन केला. हिंगणा एमआयडीसी भागात पार्टटाइम जॉब उपलब्ध असल्याचे सांगून टाले यांना शाहिन इंडिया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगितले. तेथे २० रुपये रजिस्ट्रेशन फी भरायला सांगितली. २० रुपये जमा करताच त्यांच्या खात्यातून आरोपींनी २०२० रुपये काढून घेतले. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा आरोपीने चुकून दोन हजार रुपये जास्त काढून घेण्यात आल्याचे सांगून ते परत करतो. तुम्हाला मी ओटीपी नंबर पाठवतो, असे आरोपीने सांगितले. काही वेळानंतर आरोपीने टाले यांना ओटीपी नंबर विचारला. तो सांगताच सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९४० रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदविली. तब्बल साडेतीन महिने तपास केल्यानंतर सायबर शाखेने हे प्रकरण अंबाझरी पोलिसांकडे पाठवले. त्यानंतर फिर्यादी विक्रांत टाले यांची तक्रार नोंदवून एपीआय घोडके यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.