मधमाशांच्या १० लाख काॅलनी दरवर्षी हाेतात नष्ट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:15+5:302021-06-25T04:07:15+5:30
निशांत वानखेडे नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण ...
निशांत वानखेडे
नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण झाली आहे. मात्र याच पाॅलिनेटर्सचे अस्तित्व मानवी हव्यासामुळे संकटात आले आहे. एका सर्वेक्षणानुसार परागीकरणातून असंख्य प्रजातीच्या झाडांचा प्रसार करण्यात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांच्या १० लाख काॅलनी चुकीच्या पद्धतीने मध गाेळा केल्याने नष्ट हाेतात. चुकीची कृषी पद्धती, रासायनिक वापर अशा विविध गाेष्टींमुळे परागीकरणाच्या इतर घटकांच्या अस्तित्वावर माेठे संकट आल्याचे दिसून येत आहे.
मधमाशांसह इतर पाॅलिनेटर्स (परागीकरण कीटक) वर दहा वर्षापासून अभ्यास करणारे डाॅ. शिखीन काेल्हे यांनी लाेकमतच्या माध्यमातून या गंभीर संकटाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देशात ७५ टक्के मध उत्पादन आग्या माेहाेळापासून तयार मिळते. जवळपास २२ हजार टन या माशांपासून काढले जाते. चुकीच्या पद्धतीने मध काढल्याने दरवर्षी १० लाख वसाहती नष्ट हाेतात. एका वसाहतीत ५० हजाराच्यावर माशा असतात, म्हणजे हाेणारे नुकसान लक्षात येते. त्यामुळे १० वर्षापूर्वी मुबलक प्रमाणात दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. चीनमध्ये मधमाशांच्या कमतरतेमुळे येथील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरश: माणसे लावून परागीकरण करावे लागत असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डाॅ. काेल्हे यांच्या मते इतर कीटकांबाबतही हेच हाेत आहे. परागीकरणामध्ये मुंग्या, फुलपाखरे, माॅथ, विविध प्रजातीचे भुंगे (बीटल्स) या किटकांचे महत्त्व आहे. माकडेसुद्धा परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. फूड ॲन्ड ॲग्राे ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार जगातील १ लक्ष ८० हजार वृक्षांचे परागीकरण याच किटकांवर अवलंबून आहे. म्हणजे ७० ते ८० टक्के वृक्षांचा प्रसार या पाॅलिनेटर्समुळे हाेताे. यामध्ये ३५ ते ४० टक्के म्हणजे १२०० प्रजातीच्या कृषी पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ८० टक्के पिकांच्या परागीकरणामध्ये मधमाशा आणि फुलपाखरांचे महत्त्वाचे कार्य आहे.
२५० दशलक्ष वर्षपासून भुंग्यांचे अस्तित्व
परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विविध प्रकारचे भुंगे हे जवळपास २५० दशलक्ष वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात असल्याची माहिती डाॅ. काेल्हे यांनी दिली. हे भुंगे जवळपास २ लक्ष ४० हजार फुलझाडांच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पाॅलिनेटर्स संकटाचे तीन कारणे
- अधिवास नष्ट हाेणे : नागरीकरण, रस्ते बांधकाम, औद्याेगिकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाले आहेत.
- चुकीची कृषी पद्धती : पर्यावरण संकटात येण्यासाठी आताचे १०० वर्षे कारणीभूत ठरल्याचे बाेलले जाते पण डाॅ. काेल्हे यांच्यामते पृथ्वीवर कृषीकरण सुरू झाल्यापासून हे संकट निर्माण झाले. मुळेही परागीकरणाचे घटक संकटात आले आहेत. पिकासाठी झाडे कापणे, एकाच प्रकारचे पीक अशा गाेष्ट कारणीभूत आहेत.
- अमर्याद रसायनांचा वापर : पिकांसाठी पेस्टीसाईड, खतांचा अमर्याद वापर कीटक नष्ट हाेण्याचे माेठे कारण आहे.
अमेरिकन सरकारने २०१५ पासून पाॅलिनेटर्सच्या संवर्धनासाठी कमिशनची स्थापना केली आहे. कृषी प्रधान भारतात हे हाेणे गरजेचे आहे. सरकारने जनसहभागातूनीहे कार्य करावे. शालेय स्तरापासून मधमाशा व इतर कीटकांच्या अभ्यासाचा समावेश व्हावा. व्यापक जनजागृतीची गरज आहे.
- डाॅ. शिखीन काेल्हे, मधमाशा व कीटक अभ्यासक