एक महिन्याच्या बाळाची हत्या : आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 08:15 PM2019-08-20T20:15:19+5:302019-08-20T20:16:31+5:30
नराधमाने सासरी जाऊन साळीच्या एक महिन्याच्या बाळाच्या पोटावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ही हृदयद्रावक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखारी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा/पारशिवनी) : माहेरी असलेली बायको परत येत नाही.साडभाऊ मोबाईलवर बायकोशी संभाषण घडवून आणत नाही, त्यामुळे चिडलेल्या नराधमाने सासरी जाऊन साळीच्या एक महिन्याच्या बाळाच्या पोटावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या दुर्दैवी बाळाचा उपचारादरम्यान नागपूर येथील मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखारी येथे सोमवारी (दि. १९) दुपारी १ ते १.४५ वाजताच्या दरम्यान घडली. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश गोविंदराव बोरकर (४१) रा. कुही असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची साळी रुपाली जितेंद्र पांडे (२४) रा. भामेवाडा, ता. कुही हिला १७ जुलै रोजी मुलाला झाला. बाळंतपणासाठी ती बखारी येथे माहेरी होती. त्यातच गणेश व त्याची पत्नी प्रतिभा यांच्यात भांडण झाल्याने ती सहा महिनाभरापासून माहेरीच होती. त्याचा साडभाऊ जितेंद्र हा देखील बखारी येथे सासरी होता. या काळात गणेशला प्रतिभाशी बोलावयाचे होते. त्यामुळे त्याने जितेंद्रच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, जितेंद्रने यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो चिडला होता.त्यातच तो सोमवारी दुपारी बखारी येथे आला. त्यावेळी रुपाली एकटीच घरी होती. घरातील मंडळी शेतावर कामासाठी गेली होती. गणेशने तिला रुमाल धुवून देण्याची विनंती केली. बाळंतीण असल्याने तिने नकार दिला. शिवाय, तिने तो रुमाल धुण्यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेकडे नेला. त्याच काळात रुपाली बाहेर गेल्याचे पाहून गणेश तिच्या खोलीत शिरला व कुणीही नसल्याचे पाहून त्याने बाळाच्या पोटावर उजव्या भागाला चाकूने वार केले. त्यातच रुपाली घरी आली, तेव्हा त्याने तिच्या हातातील रुमाल हिसकावून घेत पळ काढला.
रक्तबंबाळ अवस्थेतील बाळ व त्याची बाहेर आलेली आतडी पाहून रुपाली घाबरली. ती बाळाला घेऊन रडत बाहेर आली. त्यामुळे शेजारीही गोळा झाले. तिची आई इंदिरा, वडील खुशाल, बहीण प्रतिभा घरी आले. त्यांनी बाळाला लगेच कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमोपचार करून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे सायंकाळी बाळाने शेवटचा श्वास घेतला. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तपास ठाणेदार विलास काळे करीत आहेत. ही कारवाई मुदतसर जमाल, रोशन काळे, बादल गिरी, हरीश सोनभद्रे, अमित यादव व कोठे यांनी केली.
साडभावाला मारण्याचा विचार
पती गणेशसोबत पटत नसल्याने प्रतिभा सहा महिन्यापासून माहेरी होती. तिची सासरी जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, सासरची मंडळी तिला पाठवीत नसल्याचे गणेशला वाटत होते. त्यामुळे त्याचा सासरच्या मंडळींनी रोष होता. शिवाय, त्याला प्रतिभाशी बोलण्याची इच्छा असूनही साडभाऊ जितेंद्र त्याला सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे जितेंद्रला मारण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. याच उद्देशाने गणेश बखारी येथे आला होता. त्यावेळी जितेंद्र घरी नव्हता. तो त्याला न दिसल्याने त्याने जितेंद्रच्या बाळाला संपविले. त्याने लगेच बखारीहून कुही गाठले. शिवाय, त्याने टक्कलही केले होते.
सहा दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी गणेशला पारशिवनी पोलिसांनी सोमवारी रात्री कुही येथील बाजार चौकातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही पोलिसांना सांगितले. त्याला मंगळवारी दुपारी पारशिवनी येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची अर्थात सोमवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलीस त्याने गुन्ह्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त करणार असून, त्याने बाळालाच नेमके का मारले, याचाही शोध घेणार आहेत. गणेश हा ट्रकचालक असून, त्याला तीन मुली आहेत.