नागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:19 PM2019-11-11T23:19:59+5:302019-11-11T23:21:12+5:30
एक महिन्याच्या नवजात शिशूला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नख देखील निळसर पडले होते. दूध घेण्यासही असमर्थ ठरल्याने प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कोंजेनिटल हार्ट’ आजाराचे निदान करून उपचार केले. यामुळे २४ तासात शिशूचे प्राण वाचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसांकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. फुफ्फुसातून आलेले शुद्ध रक्त डाव्या ‘वेंट्रिक्युलर’द्वारे पुन्हा फुफ्फुसांमध्ये वळत होते. यामुळे शुद्ध रक्त ‘नॉर्मल सक्युर्लेशन्स’पर्यंत पोहचत नव्हते. यामुळे एक महिन्याच्या नवजात शिशूला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नख देखील निळसर पडले होते. दूध घेण्यासही असमर्थ ठरल्याने प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कोंजेनिटल हार्ट’ आजाराचे निदान करून उपचार केले. यामुळे २४ तासात शिशूचे प्राण वाचले.
प्राप्त माहितीनुसार, बिरसिंहपूर, सतना, मध्य प्रदेश येथील एका, एक महिन्याच्या या अर्भकाला २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:४५ वाजता नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. शिशूचे संपूर्ण शरीर निळे पडले होते. अर्भकाला ‘इन्टेंसिव्ह केअर युनिट’मध्ये दाखल केले. बालरोग तज्ज्ञ व ‘न्यूनॅटोलॉजिस्ट’ डॉ.कुलदीप सुखदेवे व पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रमोद आंबटकर यांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कन्जनायटल हार्ट’ आजाराचे निदान केले. याला ‘डी-ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट अॅटरिज विथ इन्टॅक्ट वेन्ट्रिकुलर सेप्टम’ असेही म्हटले जाते. या आजाराचे चुकीचे निदान किंवा उपचाराला उशीर झाल्यास मृत्यूचा धोका होता. डॉ. सुखदेवे यांनी २५०० ग्रॅमच्या या अर्भकावर कॅथराईज्डच्या मदतीने ‘रॅशकाइंड बलून अॅट्रियल सेप्टोस्टोमी अँक्सेस’ उपचार केले. डॉ. आंबटकर यांनी यशस्वीरित्या ‘बीएएस’ केले. परिणामी, आजारी नवजात शिशू २४ तासांत बरे झाले. तीन दिवसांत इस्पितळामधून सुटीही देण्यात आली. डॉ. सुखदेवे म्हणाले, वेळेत तपासणी, योग्य निदान व उपचारामुळे शिशूचे प्राण वाचले. हे इंटरव्हेशन्स केवळ बाळालाच वाचवू शकत नाही तर नियोजित शस्त्रक्रियेसाठी काही आठवड्यांचा श्वासोच्छवास कालावधी देखील देऊ शकतो. डॉ. आंबटकर यांनी स्पष्ट केले की, ही उपचारपद्धती गुंतागुंतीची असलीतरी कौशल्य व अनुभवामुळे ती यशस्वी होऊ शकली. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले की, भारतात ‘डी-टीजीए’ आणि ‘इंटॅक्टवेंट्रीक्युलर सेप्टम’ असलेले बहुतांश रुग्णांचा वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्यू होतो. या यशस्वी उपचाराचे संस्थेचे अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालिका डॉ. उषा नायर, डॉ. विद्या नायर, डॉ.विनया नायर आदींनी कौतुक केले.