ओमायक्रॉनमुळे एक टक्का बालकांना रुग्णालयाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 07:40 PM2021-12-23T19:40:05+5:302021-12-23T20:07:19+5:30

Nagpur News कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी (पीडियाट्रिक टास्क फोर्स) गुरुवारी वर्तविला.

One percent of children need hospitalization due to Omaicron! | ओमायक्रॉनमुळे एक टक्का बालकांना रुग्णालयाची गरज!

ओमायक्रॉनमुळे एक टक्का बालकांना रुग्णालयाची गरज!

Next
ठळक मुद्देटास्क फोर्सने वर्तविला अंदाजबालकांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचा विभागीय आयुक्तांच्या सूचना

नागपूर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी (पीडियाट्रिक टास्क फोर्स) गुरुवारी वर्तविला. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी बालकांच्या उपचारासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा दुस-या रुग्णाची नोंद गुरुवारी नागपुरात झाली. देशात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आतापर्यंत महाराष्ट्रात आढळून आले आहेत. याचा संसर्ग वाढल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यावर गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिकेचे अपर आयुक्त राम जोशी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सी. एम बोकडे, डॉ. विनिता जैन, डॉ. सायरा मर्चंट, डॉ. उदय बोधनकर, डॉ. कुश झुणझुणवाला व डॉ. कृष्णा सिरमनवार आदी उपस्थित होते.

-रुग्णालयांमध्ये बालकांसाठी खाटा राखीव ठेवा

टास्क फोर्सने वर्तविलेल्या अंदाजावरून कोरोनाबाधित बालकांच्या उपचारासाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्यात, तसेच पुरेशा प्रमाणात औषधी, इतर आवश्यक सामग्री व मनुष्यबळ सज्ज ठेवणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचनाही लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.

-पालकांमध्ये जनजागृती करा

कोविड बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात दिरंगाई होवू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बाधित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियोजन करावे. महापालिकेने बालकांच्या उपचारासाठी शहरात स्वतंत्र सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याकरिता तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता पाठपुरावा करावा, असे अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.

Web Title: One percent of children need hospitalization due to Omaicron!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.