नागपुरातील वाठोड्यात एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:47 PM2019-10-11T23:47:37+5:302019-10-11T23:49:39+5:30
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने शुक्रवारी सकाळी आराधनानगर आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने शुक्रवारी सकाळी आराधनानगर आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्ती कोण, कुठला ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. बिडगाव आऊटर रिंग रोड, आराधनानगरच्या पांदण रस्त्यावर त्याचा मृतदेह पडून असल्याचे शुक्रवारी सकाळी या भागातील लोकांना दिसले. त्यामुळे एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविले. नियंत्रण कक्षाने वाठोडा पोलिसांना सांगताच पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. मृताच्या डोक्यावर, कपाळावर रॉड किंवा लोखंडी पाईपने फटके मारून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. मृताची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्यांना पोलिसांनी विचारणा केली. मात्र, ओळख पटेल अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मृत व्यक्तीच्या कपड्यात एकही कागद, मोबाईल अथवा रुपया आढळला नाही. चप्पलही त्याच्या पायात नव्हती. पेहराव्यावरून तो मजूर असावा, त्याला पूर्व वैमनस्यातून या ठिकाणी आणून मारले असावे आणि ओळख पटू नये म्हणून त्याच्या खिशातील कागद, पैसे तसेच मोबाईल पळवून नेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. वाठोडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या भागातील मजुरांच्या झोपड्यांवर विचारपूस करून तसेच विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवून त्याआधारे मृताची ओळख पटविण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.