नागपुरात ‘बीसीसीए’ प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच ‘मिसिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:40 PM2018-04-17T12:40:15+5:302018-04-17T12:41:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये चुका सुरूच आहे. रविवारी तर एक वेगळीच चूक समोर आली. चक्क प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नव्हता. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व परीक्षा केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये चुका सुरूच आहे. रविवारी तर एक वेगळीच चूक समोर आली. चक्क प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नव्हता. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व परीक्षा केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला.
सोमवारी ‘बीसीसीए’चा प्रथम सत्राचा ‘फंडामेन्टल कॉम्प्युटर’ या विषयाचा पेपर होता. यात प्रश्नपत्रिकेत १० प्रश्न असणे अनिवार्य होते. मात्र प्रत्यक्षात प्रश्नपत्रिकेमध्ये ९ प्रश्नच छापून आले होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी याची तक्रार पर्यवेक्षक व केंद्र अधिकाऱ्यांजवळ केली. त्यांनी विद्यार्थ्यांना कुठलीही मदत करण्यास नकार दिला. जो प्रश्न नाही, त्याला विसरून उर्वरित प्रश्न सोडविण्याची सूचना केली व विद्यार्थ्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व गोंधळ घातला. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरेच लिहिली नाहीत. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थी किंवा केंद्र कुठूनही तक्रार आलेली नाही. जर तक्रार आली तर विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.विनायक देशपांडे यांनीदेखील यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हा पेपर २४ मार्च रोजी होणार होता. मात्र दीक्षांत समारंभामुळे हा पेपर १५ एप्रिल रोजी घेण्यात आला.
‘कॉमर्स’मध्येच चुका का?
यंदाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये सर्वात जास्त चुका वाणिज्य व व्यवस्थापन शाखेअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येच दिसून येत आहे. अगोदर ‘बीबीए’ अंतिम वर्ष व त्यानंतर ‘बीकॉम’ अंतिम वर्ष व ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतदेखील त्रुटी आढळून आल्या. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.