‘वन रँक वन पेन्शन’ पैशांची नाही प्रतिष्ठेची मागणी
By Admin | Published: August 15, 2015 03:11 AM2015-08-15T03:11:29+5:302015-08-15T03:11:29+5:30
सेवानिवृत्त कर्नल व्ही. एन. थापर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ ही पैशांची नाही, प्रतिष्ठेची मागणी आहे
कर्नल व्ही. एन. थापर : सरकारच्या संवेदनहीनतेवर व्यक्त केली खंत
नागपूर : सेवानिवृत्त कर्नल व्ही. एन. थापर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ ही पैशांची नाही, प्रतिष्ठेची मागणी आहे असे स्पष्ट करून यासंदर्भात शासनातर्फे संवेदनहीनता दाखविण्यात येत असल्यामुळे खंत व्यक्त केली.
सेंट विन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी थापर शहरात आले आहेत. दरम्यान, त्यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधून विविध मुद्यांवर परखड भूमिका मांडली. कारगील युद्धात शहीद झालेले व मरणोत्तर वीरचक्रप्राप्त कॅप्टन विजयंत थापर यांचे ते वडील होय. त्यांनी जम्मू अॅन्ड काश्मीर रायफल बटालीयनचे नेतृत्व केले आहे. सेवानिवृत्त सैनिकांतर्फे दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘वन रँक वन पेन्शन’साठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याविषयी बोलताना थापर यांनी रोखठोक मत व्यक्त केले. देशातील राजकारणी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करतात. त्यांना भोजन, निवास, वाहने व प्रवास खर्चात सूट मिळत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांना दोन पैसे जास्त मिळाले तर बिघडले कोठे? सैनिक स्वत:च्या प्राणाची व कुटुंबीयांच्या भविष्याची चिंता त्यागून देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्यासंदर्भात शासन ज्याप्रमाणे संवेदनहीनता दाखवित आहे त्याचा सेवारत सैनिकांच्या मनावर वाईट परिणाम पडू शकतो. ही मागणी केवळ पैशांसाठी नसून सैनिकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न त्यासोबत जुळलेला आहे असे थापर यांनी सांगितले.
सेवानिवृत्त सैनिक या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत व कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे देशाला धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ज्यांनी देशाचे रक्षण केले त्यांच्यामुळे कसा धोका होऊ शकतो. एकीकडे आपण स्वातंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे सेवानिवृत्त सैनिकांचा बळजबरीच्या कारवाईद्वारे अवमान केला जात आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनच इतरांच्या तुलनेत सैनिकांना कमी लेखले जात आहे याकडे थापर यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)