नागपुरात एकतर्फी प्रेमात विद्यार्थ्याने कापला स्वत:चा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 09:34 PM2018-01-24T21:34:42+5:302018-01-24T21:36:13+5:30
एकतर्फी प्रेमसंबंधात कुही येथील एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या समोरच ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी दिघोरी टेलिफोन चौक येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमसंबंधात कुही येथील एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या समोरच ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी दिघोरी टेलिफोन चौक येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संदीप वासनिक (२२) रा. कुही असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.
संदीप हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचा मित्र नागपुरात राहतो. तो दोन दिवसांपूर्वी मित्राला भेटण्यासाठी नागपूरला आला होता. या प्रकरणाशी संबंधित तरुणीसुद्धा कुहीची राहणारी आहे. ती टेलिफोन चौक येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करते. आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहते. तरुणीच्या लहान भावाची संदीपसोबत मैत्री होती. त्यामुळे तो तिला ओळखत होता. काही दिवसांपासून तो तरुणीसमोर आपले प्रेम व्यक्त करीत होता. परंतु तिने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. नुकतीच त्या तरुणीचे लग्न निश्चित झाले. तेव्हापासून संदीप अतिशय दुखावला होता. तो सकाळी १० वाजता टेलिफोन चौकातील मेडिकल स्टोअरमध्ये आला. मिंळालेल्या माहितीनुसार संदीप त्या तरुणीला धमकावू लागला. तिने लग्न केले तर कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी आणि मेडिकल स्टोअरमध्ये उपस्थित लोक घाबरले. काही कळण्यापूर्वीच संदीप मेडिकल स्टोअरमधून बाहेर पडला, आणि स्टोअरसमोरच त्याने ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर चार-पाच वार केले. तरुणी आणि इतर लोक वाचवण्यासाठी धावले. त्यांनी संदीपला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने ऐकले नाही रक्तबंबाळ अवस्थेत तो एका गल्लीत पळाला. थोड्या अंतरावर जाऊन तो खाली पडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संदीपच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. नंदनवन पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.
कुणी मदत करू शकले नाही
संदीपच्या हातात ब्लेड होती. तो ब्लेडने वार करीत, हवेत हातवारे करीत होता. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी पुढे जाणे म्हणजे स्वत:ला जखमी करून घेणे होते. त्यामुळे कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. दरम्यान, नगरसेवक विजय झलके तेथून जात होते. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच संदीपला आपल्या कारने रुग्णालयात पोहोचविले. नंदनवन पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संदीपच्या कुटुंबीयांना सूचित केले.
मानसिक अवस्थेतून उचलले पाऊल
संदीप हा बी.टेक. दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. संदीप मानसिकदृष्ट्या विचलित असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीय व मित्रसुद्धा हादरले आहेत. संदीप काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. परंतु तो इतके गंभीर पाऊल उचलेल, असे कुणाला वाटले नाही. तो अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते.