सर्व शिक्षा कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:44 PM2019-12-16T23:44:17+5:302019-12-16T23:45:20+5:30
शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी मागील १६ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. शासन सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्यांची वयोमर्यादेची सेवा शासन सेवेत गेली. शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. सर्व शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा अशा घोषणा देऊन त्यांनी शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी रेटून धरली. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलनाला भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आवाज विधानसभेत उचलण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळास दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत २००३ मध्ये योजना सुरू झाली तेव्हापासून शासकीय पदभरतीच्या नियमानुसार कंत्राटी पदावर १३ ते १६ वर्षांपासून विविध पदांवर शासकीय सेवेत करार पद्धतीने कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना शासन सेवेत कायम करण्यात आलेले नाही. तुटपुंज्या मानधनावर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळे शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून ते विधान भवनावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरत आहेत. परंतु आजपर्यंत सातत्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समितीने यावर्षीही आपल्या मागणीसाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. मोर्चात सहभागी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली. आंदोलनानंतर कृती समितीचे प्रकाश आंबेकर, भाऊसाहेब नेटके, लक्ष्मीकांत पोटोडे, श्री टेकाडे यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची १५ वर्षांची सेवा झाली ही मोठी बाब असून शासन याबाबत गंभीर असून यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला.
नेतृत्व : प्रकाश आंबेकर, लक्ष्मीकांत पोटोडे, भाऊसाहेब नेटके, श्री टेकाडे, रवींद्र इंगळे, सचिन देशट्टीवार, उमेश भरणे, वशिष्ठ खोब्रागडे, प्रफुल वासनिक, वनिता वंजारी, अभय सावंकर, अनिता ठेंगडी.
मागणी : सर्व शिक्षा योजनेंतर्गत करार सेवेतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या.