‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजना; महाराष्ट्रातील ६९ रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 08:15 AM2023-05-16T08:15:00+5:302023-05-16T08:15:01+5:30

Nagpur News राज्यातील ६९ रेल्वेस्थानकांवर ७२ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यामधून त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांची विक्री करून स्थानिक उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'One Station, One Product' scheme; Sale of local products at 69 railway stations in Maharashtra | ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजना; महाराष्ट्रातील ६९ रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री

‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजना; महाराष्ट्रातील ६९ रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री

googlenewsNext


नागपूर : ‘व्होकल फॉर लोकल’ दृष्टिकोन प्रशस्त करून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजनेला रेल्वेने महाराष्ट्रात चांगलेच उचलून धरले आहे. राज्यातील ६९ रेल्वेस्थानकांवर ७२ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यामधून त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांची विक्री करून स्थानिक उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नॅशनल डिझाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ओएसओपी केंद्रांची एकसमान रचना करण्यात आली. प्रत्येक केंद्रात त्या त्या प्रदेशातील कारागिरांनी बनविलेल्या कलाकृती, विणकरांनी बनविलेली हातमाग वस्त्रे, लाकडावरील कोरीवकाम, चिकनकारी आणि जरी-जरदोजी यांसारखे कपड्यांवरील कलाकुसरीचे काम, अथवा त्या प्रदेशात उत्पादन होत असलेले मसाले पदार्थ, चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले/अर्ध प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ/उत्पादने यांचा समावेश करण्यात आला आहे.

बडनेराची सांबारवडी, इगतपुरीची द्राक्षे

महाराष्ट्रात, रेल्वेस्थानकांवरील ओएसओपी आउटलेट्समधील विविध उत्पादनांमध्ये केळी, द्राक्षे, पापड, अहमदनगर येथे लोणचे, बडनेरा येथे सांबारवडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे चामड्याची उत्पादने, घरोघरी वापरण्यात येणारी अगरबत्ती, धूप, साबण, चिंचवड येथे फिनाइल, चर्चगेट येथे चामड्याची उत्पादने यांचा समावेश आहे.

गोरेगाव येथील खादी उत्पादने, इगतपुरी येथील पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणची, पापड इत्यादी हंगामी फळे व खाद्यपदार्थ, कोल्हापूर येथे हाताने तयार केलेली कोल्हापुरी चप्पल, कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी, लोणावळा येथे चिक्की व फळ उत्पादने केंद्रात ठेवण्यात आली आहेत.

विठ्ठलाची मूर्ती अन् पैठणीही

अनेक केंद्रांत पंढरीच्या विठुरायाची मूर्ती, कुंकू (कुमकुम), अगरबत्ती, पूजा साहित्य, नाशिक रोडला पैठणी, नागपूरला बांबू उत्पादने, साताऱ्याचा कंदी पेढा, शेगावला पापड आणि सोलापूर स्थानकावरच्या केंद्रावर सोलापुरी थाटाच्या चादरी, टॉवेल आदींचाही त्या-त्या रेल्वेस्थानकावरच्या केंद्रात समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रवासाच्या निमित्ताने विविध रेल्वेस्थानकांवर ठिकठिकाणचे प्रवासी उतरतात, चढतात. त्यांच्याकडून या केंद्रांना खरेदी-विक्रीचा चांगला प्रतिसाद मिळतो.

Web Title: 'One Station, One Product' scheme; Sale of local products at 69 railway stations in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.