नराधमाच्या हातून वाचला एकाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:13 AM2018-06-26T00:13:32+5:302018-06-26T00:16:19+5:30
नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला.
विवेकची विचारपूस करताना एकेक प्रकरण समोर येत आहे. विवेकच्या महाकाळकर ले-आऊट येथील घरात पोलिसांना एका पोस्टरवर कमलाकरसह पांड्याचे नावही लिहिलेले आढळून आले होते. पोलिसांनी कमलाकरचे कुटुंबीय आणि इतर लोकांना पांड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश याला पांड्या म्हणत असावा, असा अर्थ लावला. पोलिसांनी जेव्हा विवेकला याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने पांड्या नवरगाव येथे राहत असलेल्या युवकाचे नाव असल्याचे सांगितले. विवेकनुसार पांड्या त्याच्या शेतात मजुरी करीत होता. पांड्यासोबत त्याचे भांडण झाले होते. तेव्हा त्याने पांड्यालाही संपवण्याचा निश्चय केला होता. त्यामुळेच त्याचे नावही पोस्टरवर लिहून ठेवले होते. कमलाकरनंतर पांड्याचाही खून करण्याचा त्याचा विचार होता. परंतु या हत्याकांडानंतर त्याला नागपूर सोडून जाणेच योग्य वाटले. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, याचा विवेकला विश्वास होता. त्याला आश्रय देणाऱ्या अंगद नवाच्या युवकाच्या हाती त्याचा मोबाईल लागला नसता तर विवेक आतापर्यंत पोलिसांच्या हातीही आला नसता.
विवेकचे म्हणणे आहे की, त्याने केवळ कमलाकरचा खून करण्याचे ठरवले होते. कमलाकरच्या हो मध्ये हो मिळवीत असल्याने तो अर्चनामुळेही दु:खी होता. परंतु तिचा खून करण्याचा त्याने विचार केला नव्हता. विचारपूस करतानाही विवेकला कुठलही पश्चात्ताप होत असल्याचे दिसून येत नाही. त्याचे म्हणणे आहे की, न्यायालयातून निर्दोष सुटून आल्यानंतर पुढचे जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले होते. मुलगा कृष्णाला होस्टेलमध्ये टाकण्याचा त्याचा विचार होता. त्याने शेती विकण्याच्या संदर्भात चर्चा करताना एका महिलेशी मुलाच्या होस्टेलबाबत चर्चाही केली होती. त्या महिलेनेही याला दुजोरा दिला आहे. विवेकने शांतिनगर येथील गँगस्टरसह पाच ते सहा लोकांशी शेती विकण्यााबत चर्चाही केली होती.