जिल्ह्यातील एक हजार कृषिपंपांची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:08 AM2021-03-19T04:08:39+5:302021-03-19T04:08:39+5:30
नागपूर : लॉकडाऊनच्या काळामध्ये नागपूर शहरातील थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबली. मात्र जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागामध्ये महावितरणचा कहर ...
नागपूर : लॉकडाऊनच्या काळामध्ये नागपूर शहरातील थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबली. मात्र जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागामध्ये महावितरणचा कहर सुरू आहे. घरगुती, व्यावसायिक वीजपुरवठ्यांसोबतच कृषिपंप थकबाकीदारांचा वीजपुरवठा कापणे सुरू आहे. आतापर्यंत एक हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा महावितरणने कापला आहे.
मागील राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा पुरवठा न कापण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाराष्ट्र विद्युत निमायक आयोगाच्या पुढाकारानंतर आयआयटी विशेषज्ञांच्या समितीने कृषिपंपांच्या थकीत बिलांवर आक्षेप घेतला. कृषिपंप जोडण्यांपोटी असलेली थकबाकी जवळपास ४५ हजार कोटी रुपयांवर आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापण्याचा निर्णय घेतला. या सोबतच थकबाकी माफ करण्याची योजना सुरू केली. मात्र थकबाकीचा एक हिस्सा भरणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
या दरम्यान महावितरणने वीजपुरवठा कापण्याचा धडाका लावला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार कृषिपंपांच्या जोडण्या कापण्यात आल्या आहेत. यातील अनेक जोडण्या वापरात नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे, तर जोडण्या कापल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठ्याअभावी आपण सिंचन कसे करणार, असा प्रश्न ऊस उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ हजार ९०० शेतकऱ्यांनी १०.७४ कोटी रुपयांच्या देयकांचा भरणा केला आहे. या सर्वांची थकबाकी माफ केली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण तीन लाख तीन हजार कृषिपंप कनेक्शन आहेत. यातील दहा हजार पंपांच्या जोडण्या कापल्या आहेत. उर्वरित ९३ हजारांपैकी नऊ हजार ९०० शेतकऱ्यांनी पैसे भरले असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.
...
‘तो’पर्यंत ट्रान्सफार्मरची दुरुस्ती नाही
महावितरणने पुन्हा एक आदेश काढून शेतकऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीच्या मते, ट्रान्सफार्मरसोबत कनेक्शन जुळलेल्या किमान ८० टक्के शेतकरी बिल भरणार नाही तोपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त केला जाणार नाही. यामुळे आतापर्यंत १०च्या जवळपास ट्रान्सफार्मर ठप्प पडले आहेत.
...