स्वच्छतेसाठी एक हजार कर्मचारी तैनात
By admin | Published: October 21, 2015 03:23 AM2015-10-21T03:23:51+5:302015-10-21T03:23:51+5:30
दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे तब्बल एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास हे कर्मचारी तैनात राहतील.
नागपूर : दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे तब्बल एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास हे कर्मचारी तैनात राहतील. तीन पाळीत हे कर्मचारी कार्यरत राहतील. यासोबतच कचरापेटीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात ७१० शौचालय आणि ७० स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. २४ तास पाण्यासाठी जागोजागी नळ लावण्यात आले आहे. दहा टँकर ठेवले आहे तर पाच टँकर अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)
१४ अधिकाऱ्यांवर व्यवस्थेची जबाबदारी
दीक्षाभूमीसाठी शहरातील संबंधित विभागाचे १४ ही संबंधित अधिकारी व्यवस्थेत उपस्थित राहतील आणि २१ ते २३ आॅक्टोबर या तीन दिवसासाठी हे सर्व अधिकारी व्यवस्थेला जबाबदार राहतील. १४ विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनीक्रमांक मदत केंद्रात आणि पोलीस नियंत्रण कक्षात प्रथमच ठेवण्यात येईल. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना शॉपिंग स्ट्रीटची माहिती देण्यात येईल. जेणेकरुन त्यांना खरेदीचा त्रास होणार नाही. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासन यांनी तीन दिवस सातत्याने या व्यवस्थेकडे लक्ष देऊन कामाला लागावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
दीक्षाभूमीसाठी १२७ बसेसची व्यवस्था
शहरातील विविध वस्त्यांमधील नागरिकांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी नागपूर शहर बस सेवेतर्फे १२७ बसेसची व्यवस्था करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमधधून या बसेस थेट दीक्षाभूमीसाठी सोडल्या जातील. तसेच ड्रॅगन पॅलेसाठी एस.टी. महामंडळातर्फे २२ बसेस कामठी ते नागपूर अशा धावणार आहेत.
२४ तास राहणार वीज पुरवठा
विद्युत विभागातर्फे २१ ते २३ या तीन दिवसांकरिता एक कार्यकारी अभियंता आणि एक सहायक अभियंत्याची नेमणूक केली आहे. विद्युत पुरवठा सतत सुरू राहील याची दक्षता या अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे.