नागपुरात दीड लाखांचे एक टन प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 07:23 PM2020-02-24T19:23:19+5:302020-02-24T19:26:32+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले. गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिकेच्या नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथकाद्वारे वाहन चालकावर कारवाई करीत प्लास्टिक जप्त करून दंड वसुल करण्यात आला.
वर्धा मागार्ने शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक मालाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक पी.एम.मोहेकर व त्यांच्या सहका-यांनी वर्धा रोड चिचभवन येथे सापळा रचला. सदर मार्गावर वाहनांची झडती घेतली असता टाटा एस. वाहन क्रमांक एमएच ३२ क्यू ६०२१ या वाहनामध्ये शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्या. नंदनवन पोलिस स्टेशन पथकाद्वारे वाहन चालक गिरीश मुरलीधर अदानी (वय ३२ वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा व रवी मुरलीधर अदानी (वय ३० वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा यांच्यासह वाहनातील प्लास्टिकचा मुद्देमाल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले.
नंदनवन पोलिसाद्वारे उपद्रव शोध पथकाला कारवाईची माहिती देण्यात आली. नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांना पत्र देउन गाडी व प्रतिबंधित प्लास्टिक मुद्देमाल झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले. नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथक प्रमुख नत्थु खांडेकर यांच्या नेतृत्वात पथकाने पंचनामा व जप्तीनामा नियमानुसार तयार करून संपूर्ण माल जप्त केला. प्लास्टिक जप्ती संदर्भातील नियमानुसार प्रथम गुन्ह्याकरीता पाच हजार रुपये दंड पथकाद्वारे वाहन चालकाकडून वसूल करण्यात आला.