‘एक गाव, एक वाण’ याेजना; ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 08:19 PM2022-07-02T20:19:21+5:302022-07-02T20:20:41+5:30
Nagpur News ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे.
नागपूर : राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने नागपूर जिल्ह्यात दाेन वर्षांपासून ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प (स्मार्ट काॅटन) राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांंमधील एकूण २,८५७ हेक्टरमध्ये राबविला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात लांब धाग्याच्या दर्जेदार कापसाचे उत्पादन व्हावे, कापड उद्याेगाला चांगल्या दर्जाची रुई व पर्यायाने धागा मिळावा तसेच कापूस मूल्य साखळी मजबुत व्हावी, यासाठी हा प्रकल्प राबविला जात असल्याची माहिती कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांचे एकूण चार क्लस्टर तयार केले आहेत. हा प्रकल्प जिल्ह्यातील एकूण २,८५७ हेक्टरमध्ये राबविण्यात येत असून, एका क्लस्टरमध्ये कपाशीच्या एकाच वाणाचे उत्पादन घेतले जात असल्याचे अरविंद उपरीकर यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण ६६ गावांची निवड केली आहे. शेतकऱ्यांना एक एकर अथवा एक हेक्टरपर्यंतची मार्यादा निर्धारित केली आहे. या प्रकल्पात सहभागी हाेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाेबतच प्रति हेक्टरी ७,५०० रुपयांचे अनुदानही दिले जाते.
२,८५७ हेक्टरवर प्रकल्प
कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प (स्मार्ट काॅटन) हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात २,८५७ हेक्टरवर राबविला जात आहे.
या प्रकल्पासाठी जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
लांब धाग्याच्या कापसाला प्राधान्य
या प्रकल्पांतर्गत दर्जेदार व लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य व प्राेत्साहन दिले जात आहे. एका गावात एकच वाण पेरणीसाठी वापरल्याने कापसाचा दर्जा सांभाळणे व त्यांला चांगला दर मिळविणे शक्य हाेईल.
साडे सात हजार रुपयांचे अनुदान
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७,५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. बियाणे, पिकाला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, कीड व राेगांच्या व्यवस्थापनावर हे अनुदान खर्च करणे अनिवार्य असते.
गावांची निवड कशी केली जाते?
या प्रकल्पात सहभागी हाेण्यासाठी महाडीबीटी या सरकारी पाेर्टलवर अर्ज मागविण्यात येतात.
ज्या गावांमधील सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले, त्या गावाची व शेतकऱ्यांची निवड केली जाते.
शेतकऱ्यांची निवड कशी केली जाते?
निवड झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांचीच महाडीबीटी पाेर्टलवरील अर्जाच्या आधारे या प्रकल्पासाठी निवड केली जाते.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना कीट दिली जाते.
निवड झालेल्या शेतकऱ्यांची मूल्य साखळी विकास कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
दर्जेदार कापसाचे उत्पादन
नागपूर जिल्ह्यात साेयाबीनचे अपेक्षित उत्पादन हाेत नसल्याने केवळ कपाशीसाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत कापसाची उत्पादकता व उत्पादन वाढत असून, कापसाचा दर्जा उंचावताे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळण्यास मदत हाेते.
- मिलिंंद शेंडे,
अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.