नागपुरात गुंडाच्या टोळीकडून एकाची हत्या, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:52 PM2019-12-06T22:52:48+5:302019-12-06T22:53:53+5:30
दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गुंडाच्या एका टोळीने तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात झाले. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गुंडाच्या एका टोळीने तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात झाले. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. यामुळे पाचपावलीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्याने आरोपी पिंटू सुरेश बेंडेकर आणि त्याच्या साथीदारांनी शूभम सदावर्ते, पवन गणेश धार्मिक (वय १८) तसेच पियुष आगडे या तिघांसोबत वाद घातला होता. त्यावेळी आरोपी बेंडेकरच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे तो शूभमवर चिडून होता. त्यावेळी हा वाद कसा बसा निपटला. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास पाचपावली परिसरात आरोपी पिंटू बेंडेकर, त्याचा भाऊ जितेश बेंडेकर, आकाश माहुरे, बादल नरेश पडोळे, मंगेश उर्फ बजरंगी चिरोडकर, सुशांत उर्फ लल्ला सोनकुसरे, विक्की बुट्या, विक्की उर्फ कावळा, यश उर्फ दौला, कृष्णा आणि त्यांच्या ईतर साथीदारांनी शूभम, पियुष आणि पवन या तिघांना घेरले. त्यांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून शिवीगाळ करून आधी लाथाबुक्कयांनी आणि नंतर लोखंडी रॉड तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता शूभम सदावर्ते याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा ताफाही पोहचला. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पवन धार्मिकच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
गुन्ह्यात चार अल्पवयीन
या हत्याकांडाचा सूत्रधार पिंटू बेंडेकर आहे. तो आणि त्याचा भाऊ हे दोघेही गुंड असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पाचापावली पोलीस सांगतात. या दोन भावांनी आपली एक टोळी तयार केली असून, त्यात काही अल्पवयीन मुलांनाही सहभागी केले आहे. गुरुवारी रात्री आरोपी पिंटू आणि जितेशने सदावर्तेची हत्या केली त्यावेळी त्यांच्यासोबत चार अल्पवयीन आरोपीही होते. पोलिसांनी पिंटू आणि जितेशसह पाच जणांना अटक केली. ईतरांचा शोध सुरू आहे.