बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना
By admin | Published: November 30, 2014 12:54 AM2014-11-30T00:54:36+5:302014-11-30T00:54:36+5:30
शहरात कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे खावे लागतात. नगर रचना विभागाच्या कार्यप्रणालीवर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लागले आहे.
बांधकाम तज्ज्ञांची उद्या बैठक : अभियंते करणार इतर मनपांचा दौरा ‘
नागपूर : शहरात कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे खावे लागतात. नगर रचना विभागाच्या कार्यप्रणालीवर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लागले आहे. या सर्वांवर उपाय म्हणून नागरिकांना त्वरित बांधकाम परवानगी मिळण्यासाठी येत्या काळात ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचा मानस महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावे यासाठी महापालिकेने कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन द्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. याची दखल नागरिकांना त्वरित बांधकाम परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कशी राबविता येईल, यावर स्थापत्य समिती अभ्यास करून प्रस्ताव सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी सांगितले की, यासाठी महापालिका अभियंते ठाणे, अहमदाबाद, पुणे, नाशिक महापालिकेचा दौरा करून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करतील. यासोबतच क्रेडई, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, टाऊनप्लॅनर्स असोसिएशन तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत १ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल. याशिवाय ज्या नागरिकांचा या विषयाशी संबंध आहे त्यांनी त्यांच्या अडचणी व सूचना असल्यास १ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात उपस्थित रहावे. याशिवाय सामान्य नागरिकांना या विषयाशी संबंधित काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी लेखी सूचनांसह दुपारी २ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.