एक वर्षाचा रेहांश झुंजतोय दुर्लभ आजाराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:12+5:302021-01-20T04:09:12+5:30
- लोकमत मदतीचा हात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तान्हुल्याचा किलबिलाट घराला नंदनवनात रूपांतरित करतो. मात्र, तोच तान्हुला दुर्लभ ...
- लोकमत मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तान्हुल्याचा किलबिलाट घराला नंदनवनात रूपांतरित करतो. मात्र, तोच तान्हुला दुर्लभ आजाराने ग्रासतो आणि त्याला किमोथेरपी सारख्या उपचाराला सामोरे जावे लागते तेव्हा कुटूंबीयांच्या जिवाला घोर लागते. अशीच परिस्थिती कडबे कुटुंबीयांवर आली आहे. कोरोनाने नोकरी हिरावली आणि याच काळात एक वर्षाच्या बाळाला एलसीएच कॅन्सरने ग्रासले. त्याच्या इवलाशा निरागस चेहऱ्याकडे बघून माता-पिता जिवाचा आटापिटा करीत आहेत. खर्चाचा डोंगरही मोठा आहे.
वैभव व सोनल कडबे या सुशिक्षित दाम्पत्याचा रेहांश हा मुलगा. १८ जानेवारीलाच त्याने वयाचे एक वर्ष पूर्ण केले. या प्रसंगाचा आनंद वेदनेच्या काळात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी रेहांशचा जन्म झाल्यानंतर वैभव व सोनल यांना इतर माता-पित्याप्रमाणे आनंद झाला. घरात नव्या सदस्याच्या आगमनाने उल्हासित असतानाच देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि टाळेबंदी लागू झाली. त्याच्या परिणामी वैभव यांची नोकरी केली. त्यानंतर सोनलही प्रसूतिकाळ आटोपून नागपूर मनपातील आपल्या कंत्राटी नोकरीवर रुजू होण्यास सज्ज झाल्या. मात्र, त्यांना न येण्यास सांगितले गेले.
दरम्यान, रेहांशला टप्प्याटप्प्यात मानेत, काखेत आणि जांघेत गाठी यायला लागल्या. डॉक्टरांकडे तपासणी झाली आणि नंतर रेहांशला एलसीएच कॅन्सर (लान्गरहान्स सेल हिस्टिओसायटोसिस) नावाचा दुर्लभ आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याला पुढच्या उपचारासाठी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे भरती करण्यात आले आहे. खर्च मोठा आहे आणि तो कसाबसा पुरविण्याचे प्रयत्न दोघेही करीतच आहेत. हॉस्पिटलकडूनही त्यांना सहकार्य करण्यात येत आहे. तरीदेखील रेहांशच्या उपचारावर पाच लाखांच्या वर खर्च अपेक्षित आहे. नोकरी नाही, कधी मिळणार, हेही माहित नाही आणि तान्हुल्या जिवाच्या वेदनेत नोकरीचा शोध कसा घेणार, हाही एक प्रश्न आहे. अशा स्थितीत त्यांना समाजातील दानदात्यांनी अलाहाबाद बँकेच्या बजाजनगर शाखेतील खाते क्रमांक - ५०२८२३१६०७७, आयएफएससी कोड - एएलएलए०२१२८३२ वर आर्थिक मदत करण्याचे आवाहन ‘लोकमत’ तर्फे करण्यात येत आहे.
.............