नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:14 AM2019-11-08T00:14:24+5:302019-11-08T00:15:17+5:30

परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे.

Onion arrives in Nagpur, quality deteriorates | नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट

नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकिरकोळमध्ये कांदा ६० ते ७० रुपये : परतीच्या पावसामुळे पीक खराब

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे.
कळमन्यात निकृष्ट दर्जाच्या कांद्याचे भाव १५ ते ३० रुपये आहेत. किरकोळ विके्रते निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करून त्याची छाटणी केल्यानंतर किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये विकत आहे. छाटणाीनंतर अर्धाच कांदा शिल्लक राहत असल्याने या भावात कांद्याची विक्री करण्यात येत असल्याचे सोमवारी क्वॉर्टर बाजारपेठेतील विक्रेते रंगनाथ सोमवंशी यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने नवीन कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काढणीस आलेला नवीन कांदा भिजल्याने खराब झाला असून, जुन्या कांद्याचा (उन्हाळी कांदा) साठादेखील संपत आल्याने कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.
कांदे ९० टक्के खराब, १० टक्के चांगला
कळमन्यातील कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात चांगल्या प्रतिच्या कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये आहेत. चिल्लर बाजारात ७० रुपयांपर्यंत भाव गेले आहेत. या कांद्याची प्रतवारी चांगली आहे. परतीच्या पावसाआधी भाव ६० रुपये होते. कळमन्यात ९० टक्के निकृष्ट दर्जाचा कांदा आणि १० टक्के चांगल्या प्रतिचा कांदा येत आहे. कांद्याला साफ करावे लागत आहे. परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कांद्याचे पीक खराब झाले आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक (प्रति ट्रक १६ ते १८ टन) आहे. सर्वच माल विकला जात आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांदे येत आहेत. गुजरातेतील कांदा कळमन्यात आणण्यासाठी भाडे परवडत नसल्यामुळे हा कांदा आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब आणि दिल्लीला जात आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, दावणगिरी, हुगळी, कर्नुल येथून कांदे विक्रीस येत आहे. त्यामध्ये ९० टक्के लाल आणि १० टक्के पांढरा कांद्याचा समावेश आहे.
कळमन्यात दिवाळीनंतर नियमित येणारा धुळे आणि जळगाव येथील कांदा परतीच्या पावसामुळे खराब झाला आहे. दर्जा कमी आहे. या ठिकाणांहून थोडीफार आवक सुरू झाली आहे. पुढे वाढणार आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास डिसेंबर उजाडणार असून, तोपर्यंत सामान्यांना कांदा दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक येथील कांद्याचे पीक आल्यावर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे वसानी यांनी सांगितले. काढणीस असलेला कांदा खराब झाल्यामुळे जुन्या कांद्याला जास्त भाव मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३० ते ३५ रुपये भाव
गेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये होते. यावर्षी भाव ६० ते ७० रुपयांवर गेले आहेत. नाफेडने साठवणूक केलेला कांदा मध्यंतरी भाववाढ झाल्यानंतर बाजारात आणला होता. त्यामुळे आता नाफेडकडे फारसा साठा नाही. दरम्यान सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्तान आणि इराण येथून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. आयात केलेल्या कांद्याचे ८० कंटेनर भारतात दाखल झाले असून, १०० कंटेनर लवकरच येणार आहे. पण या कांद्याचा महाराष्ट्राला फारसा उपयोग होणार नाही. आयातीत कांदा पंजाब, दिल्ली आणि उत्तरोत्तर भागातच विकला जाणार आहे.

Web Title: Onion arrives in Nagpur, quality deteriorates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.