उपराजधानीत कांदा @ ६५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:01 AM2019-09-23T11:01:56+5:302019-09-23T11:02:27+5:30
सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाईत कांद्याच्या वाढीव भावामुळे लोकांचे बजेट बिघडले आहे. सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.
आवक कमी असल्यामुळे निरंतर भाववाढ सुरू आहे. त्यामुळे ठोक बाजारात भाव ६० रुपये किलोवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळमना येथील आलू-कांदे बाजारातील व्यावसायिक मोहम्मद मुसिफ म्हणाले, यावर्षी देशातील प्रमुख उत्पादक क्षेत्रात मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आहे. धुळे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून येणाऱ्या कांद्याचा दर्जा मुसळधार पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे कळमना बाजारात नवीन कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे ठोकमध्ये कांदा ४५ रुपयांवर पोहोचला आहे तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये किलो विक्री सुरू आहे.