कांद्याचे भाव घसरले, किरकोळमध्ये ३५ ते ४० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:21+5:302020-12-29T04:08:21+5:30
नागपूर : नवीन पीक बाजारात आल्यानंतर कांदे आणि बटाट्याच्या किमतीत घसरण झाली आहे. कळमना ठोक बाजारात दोन आठवड्यापूर्वी ३५ ...
नागपूर : नवीन पीक बाजारात आल्यानंतर कांदे आणि बटाट्याच्या किमतीत घसरण झाली आहे. कळमना ठोक बाजारात दोन आठवड्यापूर्वी ३५ रुपये असलेले कांद्याचे भाव रविवारी २० ते २५ रुपये किलो आणि पांढरे कांदे ३५ ते ४० रुपयावरून २५ ते ३० रुपयापर्यंत उतरले आहेत. पण किरकोळमध्ये लाल कांदे ३५ ते ४० आणि पांढरे कांद्याचे भाव ४० रुपये आहेत. ग्राहकांची क्रयशक्ती कमी असल्याने मालाला उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कळमन्यात दरदिवशी १५ ते १८ ट्रकची आवक आहे. गेल्या वर्षी याच काळात ३० ट्रकची आवक होती. लाल कांदे धुळे, जळगाव, नाशिक येथून तर पांढरे कांदे धुळे, गुजरात आणि नाशिक येथून येत आहेत. लाल कांदे १५ ट्रक तर तीन ट्रक पांढरे कांदे विक्रीला येत आहेत. थंडीच्या दिवसात मालाला उठाव कमी आहे. आवक कमी असली तरीही मागणीच्या तुलनेत पुरवठा समप्रमाणात आहे. सध्या जुन्या मालाची आवक बंद आहे. जानेवारीमध्ये कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव आणखी कमी होतील, असे मत कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले.
किरकोळमध्ये बटाटे ३० ते ३५ रुपये
कळमन्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याचे भाव कमी झाले असून, ४० रुपयाच्या तुलनेत भाव २० ते २५ रुपयापर्यंत घसरले आहेत. मात्र किरकोळमध्ये ३० ते ३५ रुपये किलो विक्री सुरू आहे. बाजारात नवीन आणि जुना बटाटे येत आहेत. आवक आग्रा, कानपूर, छिंदवाडा येथून आहे. जानेवारीत नवीन मालाची आवक वाढल्यानंतर भाव आणखी कमी होतील, असे वसानी यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून हॉटेल आणि रेस्टॉरंट ९.३० वाजता बंद होत आहेत. त्यामुळे ग्राहकी कमी असल्याने संचालक खरेदी कमी करीत आहेत. याशिवाय कोरोना काळात कळमन्यात लगतच्या जिल्ह्यात विक्रीसाठी जाणारे कांदे आणि बटाटे कमी जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी आता थेट माल बोलवीत आहेत. त्याचाही परिणाम विक्रीवर झाला आहे. पुढेही परिणाम होण्याची शक्यता आहे.
लसूण १३० रुपये किलो
कळमना ठोक बाजारात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून लसूण विक्रीसाठी येत आहे. सध्या दररोज दोन ट्रक येतात. दर्जानुसार ७० ते ९० रुपये भाव आहेत. मात्र किरकोळमध्ये १३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. जानेवारीत भाव स्थिर राहतील, असे वसानी म्हणाले.