सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:02 PM2020-04-03T12:02:25+5:302020-04-03T12:04:38+5:30
कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे नागपुरात नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. काम न मिळाल्याने मजुरांची उपासमार होत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी आणि सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यांना खाद्यान्नाचे पॅकेट आणि जीवनावश्यक वस्तू पॅक करून देण्यात येत आहेत. अशास्थितीत कांदे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी पुढाकार घेतला आहे. ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे.
कळमन्यात कांदे आणि बटाट्यांची आवक वाढली असली तरीही त्याच प्रमाणात विक्रीतही वाढ झाली आहे. अनेक संस्थांनी खरेदी वाढविली आहे. मालाचा तुटवडा असल्याचे कारण सांगून अनेक विक्रेते जास्त दरात कांदे-बटाट्यांची विक्री करीत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहे. या किमतीत कांदे खरेदी करून पॅकबंद करून वाटप करणे महागच आहे. पण कळमन्यात वसानी यांनी अर्ध्यापेक्षा कमी किमतीत कांदे उपलब्ध करून दिल्याने सेवाभावी आणि सामाजिक संस्थांची सोय होणार आहे. या संस्थांनी कळमन्यात येऊन खरेदी करावी, असे आवाहन वसानी यांनी केले आहे. याशिवाय बटाटे किमतीत संस्थांना देण्याचे आवाहन वसानी यांनी केले आहे. किरकोळमध्ये ३५ ते ४० रुपये किंमत असताना २० रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.