कांदेव्यापाऱ्याने घेतला ओळखीचा फायदा, कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 09:55 PM2022-12-15T21:55:54+5:302022-12-15T21:56:43+5:30
Nagpur News खामगाव येथील एका कांदेव्यापाऱ्याने ओळखीचा फायदा घेत नागपुरातील एका कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक केली.
नागपूर : खामगाव येथील एका कांदेव्यापाऱ्याने ओळखीचा फायदा घेत नागपुरातील एका कपडा व्यापाऱ्याची ३० लाखांनी फसवणूक केली. व्यापाऱ्याने अगोदर घेतलेले ३० लाख चुकविण्याच्या नावावर कपडा व्यापाऱ्याने सांगितलेल्या कोलकाता येथील व्यापाऱ्यास चक्क एका बाजुनेच छापल्या गेलेल्या ३० लाखांच्या बनावट नोटा दिल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन आरोपी फरार आहेत. तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोेंदविण्यात आला आहे.
ऋषी मोदी (३३) यांचे इतवारीतील शहीद चौकात कापडाचे होलसेल दुकान आहे. ते नेहमी कोलकात्यातून कपडे खरेदी करायचे. त्यांची इतर व्यापारी मित्रांमार्फत गिरीश राठी (४५, खामगाव) या कांदेव्यापाऱ्याशी ओळख झाली. राठी हादेखील कोलकात्याला कांदे पाठवितो. २१ सप्टेंबर रोजी त्याने मोदी यांना फोन करून तो कोलकात्यामध्ये असल्याचे सांगितले. त्याचा मित्र कुलदीप याला २९ लाख ९४ हजार तातडीने द्यायचे आहे व परत आल्यावर मी लगेच पैसे देतो असे त्याने मोदी यांना सांगितले. मोदी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीला पैसे दिले. त्याचवेळी मोदी यांना कोलकात्यातील एका व्यापाऱ्याल ३० लाख रुपये द्यायचे होते. राठी तेथेच असल्याने त्यांनी त्याला तेथे पैसे देऊन दे असे सांगितले. राठीने संबंधित व्यापाऱ्याला दोन हजारांच्या नोटा असलेले मोठे बंडल करून पैसे दिले. व्यापाऱ्याने घरी जाऊन तपासणी केली असता दोन हजारांच्या नोटांवर एकाच बाजूने छपाई होती व सर्व नोटा बनावट होत्या. त्याने मोदी यांना या प्रकाराची माहिती दिली. मोदी यांनी लगेच राठीला विचारणा केली. मात्र त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कुलदीप या व्यक्तीचा मोबाईल क्रमांकदेखील बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोदी यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सद्यस्थितीत दोन्ही आरोपी फरार आहेत.