ऑटोचालकांना ऑनलाईन अर्जाबाबत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:41+5:302021-05-23T04:06:41+5:30
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑटोचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम ऑनलाईन ऑटोचालकांच्या खात्यात ...
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑटोचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम ऑनलाईन ऑटोचालकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ऑटोचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ऑटोचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम ऑटोचालकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कशी मिळवावी, याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गिरीपेठ येथे ऑटोचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नेवस्कर आणि ऑटो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी वेबसाईट लिंक सुरू होणार असून, त्यावर ऑटोचालकांनी रक्कम मिळविण्यासाठी योग्य ती माहिती भरण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी अनुदानाच्या रकमेचा लाभ घेण्यासाठी टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी केले आहे.
बैठकीला संघटनेचे महासचिव राजू इंगळे, सचिव प्रिन्स इंगोले, टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, महासचिव प्रकाश साखरे, संघटक सय्यद रिजवान, कोषाध्यक्ष अशोक न्यायखोर, अब्दुल्ला पठाण, एजाज शेख, सलीम शेख, अब्दुल आसिफ उपस्थित होते.
.................