‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ फेल !

By admin | Published: January 7, 2015 01:00 AM2015-01-07T01:00:01+5:302015-01-07T01:00:01+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात पक्क्या वाहन

'Online appointment' failed! | ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ फेल !

‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ फेल !

Next

आरटीओ : पक्क्या वाहन परवान्यासाठी दीड महिन्यांचे वेटिंग
सुमेध वाघमारे - नागपूर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात पक्क्या वाहन परवान्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परंतु महिनाभरातच या योजनेचा बोजवारा उडाला आहे. एकट्या आरटीओ, शहर कार्यालयात वाहन चाचणी परीक्षेसाठी तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेची वेळ आली आहे. याचा फटका मुदत संपायला आलेल्या अनेक पक्क्या परवाना अर्जधारकांना बसत आहे. त्यांना पुन्हा शिकाऊ परवान्यापासून सुरुवात करावी लागत आहे.
आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची प्रचंड गर्दी, तासन्तास रांगेत उभे राहण्याची येत असलेली पाळी, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन विभागाने आॅनलाईन अपार्इंटमेंट योजना सुरू केली. १७ सप्टेंबर २०१४ पासून शिकाऊ परवान्यासाठी तर १ डिसेंबर २०१४ पासून पक्क्या परवान्यासाठी या योजनेची सक्ती केली.
यासाठी ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेत स्थळावर आॅनलाईन अपार्इंटमेंट घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. परंतु सध्याच्या घडीला या संकेत स्थळावर पक्क्या वाहन परवान्यासाठी लिंकच उपलब्ध होत नाही. यामुळे आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेणे किचकट झाले आहे.
आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ५०० रुपये!
वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे किचकट ठरत असल्याने, याचा फायदा अनेक नेट कॅफे आणि आता दलालांनी घेणे सुरू केले आहे. आरटीओ कार्यालयासमोरच एका खासगी वाहनात लॅपटॉपवरून अर्ज भरून दिला जात आहे. अर्जधारकाची गरज लक्षात घेऊन ५०० ते १००० रुपयापर्यंतचे शुल्क आकारले जात आहे. शहर आरटीओ परिसरात तर याचे सेंटरच उघडण्यात आले आहे.
आॅनलाईन अर्ज २० फेब्रुवारीपर्यंत फुल्ल
पक्क्या वाहन परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या वाहन चाचणी परीक्षेला मिनिटे ठरवून देण्यात आली आहेत. यामुळे आरटीओ शहर कार्यालयात दिवसभरात फक्त ६२ जणांचीच परीक्षा घेतली जात आहे. परिणामी प्रतीक्षा यादी फुगत चालली आहे. सध्या २० फेब्रुवारीपर्यंतचे अपॉर्इंटमेंट फुल्ल आहे. याचा फटका ज्यांची सहा महिन्यांची मुदत संपायला आली त्यांना आणि जे चाचणी परीक्षेत नापास झाले त्यांना बसत आहे. त्यांना पुन्हा शिकाऊ परवान्यापासून सुरुवात करावी लागत आहे.
डोकेदुखी प्रणाली
आॅनलाईन अपार्इंटमेंटसाठी उमेदवाराला ज्या संगणकावरून अर्ज सादर करावयाचा आहे, त्या संगणकावर अ‍ॅक्रोबॅट रीडर व्हर्जन ९. एक्स व इंटरनेट एक्सप्लोरर ७.० ही प्रणाली सुरू असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अर्ज गुगल क्रोम, मोझीला किंवा फायरफॉक्स या प्रणालीमध्ये सेव्ह होत नाही. जर याच ब्राऊझरमध्ये अर्ज सेव्ह करायचा असेल तर ब्राऊझर सेटिंग करून घ्यावे लागते. त्यानंतरही विविध आॅप्शन आणि अमूक बटनांवर क्लिक करण्याच्या अनेक सूचनांमुळे आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेणे डोकेदुखी ठरत आहे. सामान्यांचे तर हे आवाक्याबाहेर आहे.

Web Title: 'Online appointment' failed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.