पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘ऑनलाईन’ केंद्रीभूत प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:23 AM2020-11-26T04:23:02+5:302020-11-26T04:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांचे ७० टक्क्यांहून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांचे ७० टक्क्यांहून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठात केंद्रीभूत प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ‘ऑनलाईन’ राहणार असून दोन टप्प्यात प्रवेश पूर्ण होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली.
अगोदरच ‘कोरोना’मुळे परीक्षांचे आयोजन लांबले. ज्या वेळेला हिवाळी परीक्षांची तयारी जोरात असते, त्या कालावधीत उन्हाळी परीक्षांचे निकाल लागत आहेत. त्यामुळे आता पदव्युत्तर प्रवेश कधी होणार, यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. यानुसार विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसह संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्याक्रमांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवेश होतील. प्रवेशप्रकिया नेमकी कधी सुरू होईल, हे लवकरच घोषित करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अद्याप ‘बीएस्सी’ व ‘बीए’च्या अंतिम सत्राचे निकाल येणे शिल्लक आहे. निकाल घोषित होताच डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.