ऑनलाईन क्लासेस मुलांच्या डोळ्यांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 11:54 AM2020-12-23T11:54:02+5:302020-12-23T11:54:37+5:30

Nagpur News सततचे मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर व टीव्ही पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोळे व डोके दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.

Online classes are dangerous for children's eyes | ऑनलाईन क्लासेस मुलांच्या डोळ्यांसाठी घातक

ऑनलाईन क्लासेस मुलांच्या डोळ्यांसाठी घातक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे मागील ९ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. यामुळे मुले मोबाईल, लॅपटॉपवर ऑनलाईन क्लासेस करीत आहेत. सततचे मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर व टीव्ही पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोळे व डोके दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान वयातच मुलांना मायग्रेनसारखी समस्या उद्भवत असून हे त्यांच्या डोळ्यांसाठी घातक आहे, असे मत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. विवेक लाल यांनी व्यक्त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे १८ ते २४ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय मेंदू सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या चौथ्या दिवशी दिवशी डॉ. लाल (चंदीगढ), डॉ. सुमित सिंग (नवी दिल्ली) व डॉ. जॉय देसाई (मुंबई) यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

अध्यक्षस्थानी कोझीकोडाचे डॉ. प्रदीप कुमार, आग्राचे डॉ. पी. के. माहेश्वरी आणि रायपूरचे डॉ. संजय शर्मा होते. आयएएनचे अध्यक्ष डॉ. जे.एम.के.मूर्ती, डॉ. निर्मल सूर्या यांचीही उपस्थिती होती.

डॉ. लाल म्हणाले, मायग्रेनमुळे डोळ्याची दृष्टी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. त्यांचा स्क्रीनिंग टाईम कमी करावा, योग्य आहार, नियमित व्यायामाची मुलांना सवय लावावी. डॉ. सिंग यांनी ‘मल्टिपल स्केलेरॉसिस’ म्हणजे काय, त्याचे प्रकार, कारणे, उपाय आणि व्याप्ती याची माहिती दिली. ते म्हणाले, थकवा येणे, दृष्टिदोष, मुंग्या येणे, उंच ठिकाणाची भीती वाटणे, चक्कर येणे, तोल जाणे, अस्पष्ट उच्चार, मलमूत्रविसर्जनाच्या समस्या अशी अनेक लक्षणे या आजाराची असून या विकाराला रोखता येत नाही. वेळीच निदान केले तर त्याची तीव्रता कमी करू शकते. जीवनशैलीत अचूक बदल, समतोल आहार आणि मद्यपान, तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहिल्याने या आजाराचा प्रतिबंध करता येतो, असे ते म्हणाले. डॉ. जॉय देसाई यांनी झोप न येणे या समस्येवर भाष्य केले. ते म्हणाले, मेंदू जेव्हा झोपतो तेव्हा मेंदूतील प्रोटीनची सफाई करण्याचे काम सुरू होते. प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर चांगली झोप आवश्यक आहे. राष्ट्रीय मेंदू सप्ताहाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले व सर्वांचे आभार मानले.

Web Title: Online classes are dangerous for children's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य