‘महाज्योती’तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब
By आनंद डेकाटे | Published: August 19, 2023 05:29 PM2023-08-19T17:29:26+5:302023-08-19T17:30:19+5:30
३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
नागपूर : राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे २०२५ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विषेश म्हणजे, या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला ६ जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२५ करिता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. यात राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असावा. उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे २०२३ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र राहतील. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना ११ वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) आणि दहावी ची गुणपत्रिकेसह अन्य आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांना असा करता येणार अर्ज
महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन ‘ॲप्लिकेशन फाॅर एमएचटी-सीईटी/जेईई/नीट 2025 ट्रेनिंग’ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०७१२-२८७०१२०-२१ या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24@जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील शंका दूर करता येणार.