ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलने लावला मुलांना चष्मा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:28 AM2021-07-19T10:28:50+5:302021-07-19T10:31:52+5:30

Nagpur News सततच्या ‘स्क्रीन टाइम’चा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन अंधुक दिसण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. ज्यांना पूर्वी नव्हता त्यांना चष्मा लागला आहे तर, काहींच्या चष्म्यांचे नंबर वाढले आहेत.

Online Education and Mobile put glasses on children! | ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलने लावला मुलांना चष्मा !

ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलने लावला मुलांना चष्मा !

Next
ठळक मुद्दे मेयो, मेडिकलमध्ये रोज १५ ते २० रुग्णकोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डोळ्यांच्या समस्येत वाढ

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दीड वर्षांपासून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. पर्यायाने लॅपटॉप व मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यामुळे ‘मोबाईल अ‍ॅडीक्शन’चे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय, सततच्या ‘स्क्रीन टाइम’चा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन अंधुक दिसण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. ज्यांना पूर्वी नव्हता त्यांना चष्मा लागला आहे तर, काहींच्या चष्म्यांचे नंबर वाढले आहेत.

             कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. आता ही लाट ओसरली असलीतरी ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा धोका असल्याने निर्बंध कायम आहेत. यामुळे या शैक्षणिक वर्षातही ‘ऑनलाईन’ शिक्षणप्रणालीवरच भर दिला जात आहे. पहिले ते पदवीपर्यंतचे सर्व वर्ग होऊ घातल्याने विद्यार्थ्यांचा मोठा वेळ मोबाईल व लॅपटॉपवर जात आहे. शिवाय, इतरांना भेटणे, मैदानी खेळ बंद असल्याने फावल्यावेळी, रात्री झोपताना सुद्धा मुले मोबाईलवर चिटकून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मेयो, मेडिकलच्या नेत्ररोग विभागात डोळ्यांच्या समस्येला घेऊन रोज १५ ते २० विद्यार्थी येत आहेत.

डोळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून हे करा

-अ‍ँटी ग्लेयर चष्मा वापरावा

-चष्मा वापरत नसाल तर संगणक स्क्रीनवर अँंटी ग्लेयर ग्लास बसवा

-२०-२०चा फाॅर्म्युला वापरा. २० मिनिटानंतर पुढील २० सेकंद डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्या

-डोळ्यांना सतत चालू बंद करा. थकवा आल्यास स्क्रीनकडे न बघता दूरवर एखाद्या वस्तूकडे बघा

-दूरपर्यंत नजर जाईल अशा रीतीने बघितल्यास डोळ्यांना आराम मिळेल.

 लहान मुलांना हे धोके

सतत मोबाईल स्क्रीन बघितल्यामुळे लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. विशेषत: डोळ्यांचे दोष निर्माण होतात. डोळ्यातून पाणी येणे, डोके दुखणे, डोळे सुजणे असे प्रकार समोर येत आहेत. याचे परिणाम भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे. स्क्रीनच्या प्रकाशामुळे, किरणांमुळे केवळ डोळ्यावर परिणाम होतो असे नाही तर जीवनाच्या इतर चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होण्याची शक्यता असते.

 मुलांमध्येही डोकेदुखी वाढली

ऑनलाईन अभ्यासाच्या नावाने लहान मुले तासन्‌ता‌स मोबाईल बघतात. अंधारामध्येही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. सतत स्क्रीन बघितल्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांची झोपही बरोबर होत नाही. त्यांच्या एकूणच हालचालीवर परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 पालकही चिंतित

नलाईन शिक्षणप्रणालिचा फायदा कमी आणि तोटेच जास्त दिसून येऊ लागले आहे. अभ्यासाच्या नावाने मुले सतत मोबाईल हाताळत असतात. यामुळे डोळ्यातून पाणी येण्याचे आजार वाढले असून डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी चष्म्याचा नंबर दिला.

सुनील जवादे, पालक

दीड वर्षांपासून मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांना दिले जाणारे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचत आहे का, त्यांना समजत आहे का, याकडे कोणाचेच लक्ष नाही. शाळेच्या तासिका व्यतिरिक्त, सुटीच्या दिवशीही मुले मोबाईलवरच असतात. नाही म्हटले की चिडचिड करतात. यामुळे केवळ डोळ्यांचेच आजार वाढले नाही तर मनावरही परिणाम होत आहे.

-शरद भांगे, पालक

मुलांमध्ये चष्म्याचे नंबर वाढले

सततच्या मोबाईल व लॅपटॉपच्या वापरामुळे विशेषत: मुलांमध्ये चष्म्यांचे नंबर वाढले आहेत. ज्यांना चष्मा नव्हता आता त्यांनाही गरज पडू लागली आहे. अनेकांचा डोळ्यातील ओलसर पणा कमी झाला आहे. परिणामी, डोळ्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करताना ‘२०-२०’चा फाॅर्म्युला वापरावा.

-डॉ. अशोक मदान, प्राध्यापक नेत्ररोग विभाग, मेडिकल

Web Title: Online Education and Mobile put glasses on children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.