ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचा खर्च वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:05 PM2021-07-05T12:05:29+5:302021-07-05T12:09:12+5:30
Nagpur News विद्यार्थी घरातच बसून शिक्षण घेत असला तरी पालकांचा शैक्षणिक खर्च कमी न होता पुन्हा वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे यंदाही आभासी शिक्षणच विद्यार्थ्यांना द्यावे, असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. विद्यार्थी घरातच बसून शिक्षण घेत असला तरी पालकांचा शैक्षणिक खर्च कमी न होता पुन्हा वाढला आहे. कारण शाळेत शैक्षणिक शुल्क भरायचेच आहे आणि संसाधनावरही खर्च करायचा आहे. एक वाहतुकीचा खर्च सोडल्यास बाकी शैक्षणिक खर्च आहे तोच आहे आणि त्यातही वाढ झाली आहे. गेल्या सत्रात शिक्षण ऑनलाईन झाले. पण त्याचे फलित काही निघाले नाही. तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन शिक्षणात शैक्षणिक प्रगती शून्यच आहे.
नियमित शाळा असताना पालकांना शिक्षणासाठी शाळेच्या फीबरोबरच शालेय गणवेश, वह्या पुस्तकांचा व शालेय साहित्यांवर खर्च करावा लागत होता. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी हा खर्च पालकांना करावाच लागत आहे. उलट पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. मोबाईल, टॅब, इंटरनेट या संसाधनावर पालकांचा खर्च होत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. अशात मोबाईल, टॅब, कॉम्प्युटर यावरचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांच्या पाल्याची चांगलीच गोची होत आहे.
- इंटरनेटचा खर्च किमान ३०० रुपये
मोबाईल, टॅब असेल तरी इंटरनेट नसेल तर ऑनलाईन शिक्षण शक्य नाही. इंटरनेटवर किमान महिन्याला ३०० रुपये पालकांना खर्च करावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पालकांनी घरीच वायफायसुद्धा लावून घेतला आहे. त्याचा खर्च त्यापेक्षा जास्त आहे.
- ऑनलाईन शिक्षण असले तरी गणवेश आवश्यक
शहरातील काही शाळांनी विद्यार्थी घरून ऑनलाईन शिक्षण घेत असेल तरी शिस्त राहावी म्हणून गणवेश आवश्यक केला आहे. गणवेश घालूनच शिक्षण घ्यावे, अशीही सक्ती काही शाळांनी केली आहे. नामांकित शाळांमध्ये पुस्तके आणि शालेय साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करायचे आहे. अनुदानित शाळेत मुलांना पुस्तके नि:शुल्क मिळतात.
- ऑनलाईन शिक्षण खरेतर पालकांना परवडणारेच नाही. माझ्या घरी दोन मुले आहेत. एक सातवीत आणि एक नववीत आहे. दोघांचीही शाळेची फी भरायची आहे. पुस्तके वह्या घ्यायच्याच आहेत. दोघांसाठी दोन मोबाईल आहे. त्यांचा इंटरनेटवरचा महिन्याचा खर्च आहेच. शिक्षण ऑनलाईन असले तरी शाळा पूर्ण फी घेत आहे. फी नाही भरली तर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले जाते.
वैशाली पवार, पालक
- कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण एकमेव पर्याय आहे. पण प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणात बरीच तफावत आहे. ऑनलाईनमुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांना मानसिक विकासासाठी मोकळे वातावरण असणे अपेक्षित आहे. मोबाईलवर अभ्यास असल्याने मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाईन शिक्षणात शिस्तीची कमतरता निर्माण होते.
डॉ. मनीष ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ