पारंपरिकपेक्षा कमी खर्चात होणार ‘ऑनलाइन’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:41+5:302021-02-11T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटकर्व नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन व ...
लोकमत न्यूज नेटकर्व
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन व ऑफलाइन अशा ‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा होणार असल्या, तरी ‘ऑनलाइन’वरच जास्त भर राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून परीक्षा देणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी महाविद्यालयांतून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे पारंपरिक परीक्षांच्या तुलनेत ‘ऑनलाइन’ परीक्षा कमी खर्चात पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘कोरोना’मुळे विद्यापीठात ‘न भुतो न भविष्यति’ परिस्थिती उद्भवली व ‘ऑनलाइन’ परीक्षा घेण्यात आल्या. अद्यापही ‘कोरोना’चा प्रभाव पूर्णत: संपला नसल्याने याच पद्धतीने परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ परीक्षा देता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘ऑफलाइन’ परीक्षा घेण्यात येईल. एरवी परीक्षा आयोजित करण्यात पेपर तयार करणे, मूल्यांकन, वाहतूक, परीक्षा केंद्रांवरील सुविधा इत्यादींसाठी निधी द्यावा लागतो. सर्वसाधारणत: यात १० ते १५ कोटींचा खर्च होतो. मात्र, ‘ऑनलाइन’ परीक्षेमध्ये केवळ पेपर तयार करणे हीच महत्त्वाची बाब राहणार आहे. बहुपर्यायी प्रश्न असल्याने वेगळे मूल्यांकन करावे लागणार नाही व ‘ऑनलाइन’च मूल्यांकन होईल. त्यामुळे विद्यापीठाचा तो खर्चही वाचणार आहे. त्यामुळे पारंपरिकपेक्षा कमी खर्चात परीक्षा होईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी दिली.