नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा अखेरीस सुरळीत अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:19 AM2020-10-13T11:19:58+5:302020-10-13T11:20:20+5:30
Nagpur University सोमवारपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. आताच्या तुलनेत सर्वात जास्त संख्येत असल्याने विद्यापीठासमोर आव्हानच होते. मात्र अखेरीस हे सबमिशन योग्य रित्या झाल्याने विद्यार्थी व विद्यापीठाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेअंतर्गत सोमवारपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. आताच्या तुलनेत सर्वात जास्त संख्येत असल्याने विद्यापीठासमोर आव्हानच होते. मात्र अखेरीस हे सबमिशन योग्य रित्या झाल्याने विद्यार्थी व विद्यापीठाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोमवारी ‘मोबाईल अप’मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तर उघडल्या, मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना उत्तरे ह्यसबमिटह्ण होत असल्याचा संदेशच येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप झाला.
नागपूर विद्यापीठाची परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. पहिले दोन दिवस तांत्रिक अडचणी आल्या होत्या व शनिवारची परीक्षा सुरळीत पार पडली. तिन्ही दिवस सरासरी तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी होते. मात्र सोमवारी विद्यार्थ्यांची संख्या ही फार जास्त होती. सकाळच्या सत्रांमध्ये फारशी समस्या जाणवली नाही. मात्र दुपारी १२ नंतरच्या सत्रानंतर अगोदर अनेकांच्या प्रश्नपत्रिकाच उघडल्या नाहीत. उशिराने ‘लॉगिन’ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला. मात्र अनेकांना तो ‘सबमिट’च होत नसल्याचे संदेश आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकदेखील तणावात होते.
कुलगुरूंचा दावा, उत्तरे मिळाली
यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी सर्व उत्तरे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ झाल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी एकदा ‘सबमिट’ला ‘क्लिक’ केले की थोड्या फार फरकाच्या अंतराने उत्तरे ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ होतातच. त्यामुळे मोबाईलवर संदेश आला नाही तरी विद्यार्थ्यांनी घाबरू नये असे त्यांनी सांगितले.
यामुळे झाला संभ्रम
परीक्षा देताना गैरप्रकार होऊ नये यासाठी ‘प्रॉक्टरिंग’ करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईलमधील ‘इमेज’, कुणाशी बोलण्याचा आवाज इत्यादीदेखील ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ होत आहे. या बाबी अगोदर ‘अपलोड’ होतात व त्यानंतर उत्तरे येतात. त्यामुळे ‘सबमिट’ची बटन ‘क्लिक’ केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच संदेश येत नाहीत. मात्र ही उत्तरे काही वेळातच सर्व्हरवर जमा होतात.