बॅंक खातेदाराची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:15+5:302021-05-31T04:08:15+5:30
रामटेक : महिला बॅंकखातेदाराने निनावी फाेन काॅलवर विश्वास ठेवत, तिच्या बॅंक खात्याची गाेपनीय माहिती अनाेळखी व्यक्तीला दिली. त्या व्यक्तीने ...
रामटेक : महिला बॅंकखातेदाराने निनावी फाेन काॅलवर विश्वास ठेवत, तिच्या बॅंक खात्याची गाेपनीय माहिती अनाेळखी व्यक्तीला दिली. त्या व्यक्तीने तिच्या बॅंक खात्यातून ९९ हजार रुपयांची परस्पर उचल करीत, तिची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार रामटेक शहरात नुकताच घडला.
मनीषा विजय मानकर (४१, रा.आझाद वाॅर्ड, रामटेक) यांचे रामटेक शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकेत बचत खाते आहे. त्या बॅंकेचे एटीएम कार्ड वापरत असून, आर्थिक व्यवहारासाठी ‘फाेन पे’ या ॲपचाही वापर करतात. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्यांना एक निनावी फाेन काॅल आला. त्या व्यक्तीने आपण बॅंक अधिकारी बाेलत असल्याची बतावणी केली. मनीषा मानकर यांनी त्या अनाेळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला. त्या व्यक्तीने मनीषा मानकर यांनी त्यांच्या बॅंक खाते व फाेन पेबाबत काही गाेपनीय माहिती विचारली. त्यांनीही त्या व्यक्तीला संपूर्ण गाेपनीय माहिती दिली. त्या व्यक्तीने या गाेपनीय माहितीचा वापर करीत, मनीषा मानकर यांच्या बॅंक खात्यातून तब्बल ९९ हजार रुपयांची परस्पर उचल केली. ही बाब लक्षात येताच, त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांकडे चाैकशी केली. या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्राज्ञान अधिनियम सहकलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमाेद मकेश्वर करीत आहेत.