४०० जवानांच्या तपासणीची थाप मारून नेत्रतज्ज्ञांची ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 09:02 PM2022-06-08T21:02:29+5:302022-06-08T21:02:54+5:30
Nagpur News ४०० सुरक्षा जवानांच्या डोळ्यांची तपासणी करायची आहे, अशी थाप मारून एका व्यक्तीने शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी भावे यांची फसवणूक केली.
नागपूर : ४०० सुरक्षा जवानांच्या डोळ्यांची तपासणी करायची आहे, अशी थाप मारून एका व्यक्तीने शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी भावे यांची फसवणूक केली. आरोपीने ऑनलाईन माध्यमातून डॉ. भावे व त्यांच्या पतीच्या खात्यातून एक लाख रुपये उडविले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तंत्रज्ञानाची मदत घेत आरोपीचा शोध सुरू आहे.
६ जून रोजी सायंकाळी डॉ. भावे या घरी असताना त्यांना ९८२३०४४९०२ या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वत:चे नाव श्रीकांत शर्मा सांगितले व तुमच्या इस्पितळात ४०० जवानांची तपासणी करायची आहे. यासाठी किती पैसे लागतील, अशी विचारणा केली. सायंकाळी ५.४८ ला त्याने परत त्याच मोबाईलवरून डॉ. भावे यांना फोन केला. मी माहिती घेऊन कळविते, असे त्यांनी उत्तर दिले व फोन ठेवला. त्यानंतर सायंकाळी ६.३२ वाजता त्याने परत फोन केला व संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर एकूण पैसे, पत्ता व गुगल पेचे तपशील पाठवा, असे म्हटले. त्याने तीन मिनिटांनी परत फोन करून मुख्यालयातील अकाऊंटंट तुम्हाला प्रक्रिया सांगतील, असे सांगितले. ६.५५ वाजता त्याच मोबाईल क्रमांकावरून फोन आला व मी अकाऊंटंट बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तुम्ही दोन मोबाईल सोबत ठेवा. एका मोबाईलमध्ये गुगल पे असू द्या व दुसऱ्या मोबाईलने व्हिडीओ कॉल करा, असे त्याने सांगितले.
सायंकाळी साडेसात वाजता डॉ. भावे यांनी त्यांचे पती डॉ. सुधीर यांच्या मोबाईलवरून संबंधित क्रमांकावर व्हिडीओ कॉल केला. त्याच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर गुगल पे उघडले व एसबीआय कार्डवर क्लिक केले. त्याने एक १६ अंकी क्रमांक सांगितला. तो टाकायला सांगून त्याने ५० हजाराचा आकडा टाईप करायला सांगितला. डॉ. भावे यांनी तसेच केले. थोड्या वेळाने त्याने फोनमध्ये तांत्रिक खराबी असल्याचे कारण देत, गुगल पे त्यांच्या पतीच्या मोबाईलवर उघडण्यास सांगितले. परत त्याने तीच प्रकिया करायला सांगितले. काही वेळातच त्यांच्या पतीच्या मोबाईलवर बँक खात्यातून दोनदा ५० हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला. डॉ. भावे यांनी संबंधित बँकेला त्वरित याची माहिती दिली व बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांकडून यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे.