ऑनलाइन जुगार घोटाळ्याचा सूत्रधार रामटेके गोव्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:57+5:302021-06-30T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा ठगबाज सुदत्ता प्रमोद रामटेके याला अटक करण्यात अखेर ...

Online gambling scam facilitator Ramteke arrested in Goa | ऑनलाइन जुगार घोटाळ्याचा सूत्रधार रामटेके गोव्यात जेरबंद

ऑनलाइन जुगार घोटाळ्याचा सूत्रधार रामटेके गोव्यात जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा ठगबाज सुदत्ता प्रमोद रामटेके याला अटक करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेला यश मिळाले. पोलिसांनी गोव्यात जाऊन एका हॉटेलमध्ये त्याच्या मुसक्या बांधल्या.

ठगबाज आरोपी रामटेकेने त्याचा साथीदार लोकेश वाघमारे याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी ई गेम एशिया ऑनलाइन नामक कंपनी सुरू केली होती. या कंपनीतर्फे लुडो, क्रिकेट, फुटबॉल, टेबल पूल, कॅरम, तीन पत्ती असे एकूण १८ ऑनलाइन गेम सुरू केले. हे गेम खेळणाऱ्यांची १० टक्के रक्कम कंपनीला मिळणार, अशी थाप मारून कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना १० ते १२ महिन्यांत त्यांची रक्कम दुप्पट स्वरूपात मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्याला बळी पडून अनेकांनी ३३०० रुपयांपासून ५ लाखांपर्यंतची रोकड आरोपी रामटेके आणि वाघमारेच्या कंपनीत गुंतवली. आरोपींनी असे कोट्यवधी रुपये गोळा करून सहा महिन्यांपूर्वी नागपुरातून गाशा गुंडाळला. एका महिला डॉक्टरने तक्रार दिल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तक्रार करणारे मोठ्या संख्येत असल्याचे आणि आरोपींनी हडपलेली रक्कम कोट्यवधीत असल्याचे लक्षात आल्याने हा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेला (ईओडब्ल्यू) सोपविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात लोकेश वाघमारेला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्याचा तपास केल्यानंतर त्याला कारागृहात डांबले तर आरोपी रामटेके फरार झाला. तो गोव्यात एका हॉटेलमध्ये राहून ऐशआरामात जगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईओडब्ल्यूचे पथक शुक्रवारी गोव्यात धडकले. त्यांनी शोधाशोध करून अखेर रामटेकेला परवरी भागातील एका हॉटेलमध्ये अटक केली.

----

१ जुलैपर्यंत कोठडी

रामटेकेला रविवारी नागपुरात आणून त्याची कोर्टातून १ जुलैपर्यंत कस्टडी मिळवण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. रामटेकेने कोट्यवधींची रक्कम कुठे लवपून ठेवली, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

----

Web Title: Online gambling scam facilitator Ramteke arrested in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.