ऑनलाईन शिक्षणामुळे चुकीच्या मार्गाने पडतेय विद्यार्थ्यांचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:20 AM2021-07-09T11:20:47+5:302021-07-09T11:21:20+5:30
Nagpur News ऑनलाईन शिक्षणाने पालकांना घोर लावला आहे. विद्यार्थ्यांचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे वाढली आहे. विद्यार्थीदशेत गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. अशा तक्रारी शाळांशाळांमध्ये वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना आला आणि शाळा बंद पडल्या. सरकारने शिक्षण बंद होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. पण आज या ऑनलाईन शिक्षणाने पालकांना घोर लावला आहे. विद्यार्थ्यांचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे वाढली आहे. विद्यार्थीदशेत गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. अशा तक्रारी शाळांशाळांमध्ये वाढल्या आहेत. बहुतांश तक्रारी स्लम वस्तीतील व ग्रामीण भागातील आहे. पालकांनी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन दिला पण विद्यार्थ्यांकडून त्याचा दुरुपयोग होऊ लागला.
- अशा आहेत तक्रारी
१) ती सातव्या वर्गात आहे. आईवडील मजुरीला जातात. मुलीचा ऑनलाईन क्लास आहे म्हणून वडिलांनी मुलीला मोबाईल दिला. ही सातव्या वर्गातील मुलगी एका २८ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा मध्यरात्री २ वाजता घरापुढे आला. मुलीने दरवाजा उघडला. पण आईला जाग आल्याने प्रकरण उघडकीस आले.
२) ती नवव्या वर्गाची विद्यार्थिनी, भावाच्या मोबाईलवरून ऑनलाईन क्लासमध्ये नियमित असायची. वर्गातीलच मुलांनी तिला ऑनलाईन क्लासमध्ये अश्लील मॅसेज टाकणे सुरू केले. तिने भावाकडे तक्रार केली. भावाने वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाला मारहाण केली. आता तो मुलगा धमक्या देतोय. वडिलांनी मुलीचे शाळेतून नाव काढण्यासाठी अर्ज केलाय.
३) ती नवव्या वर्गात आहे. शहरातील स्लम वस्तीत राहते. तिला वडील नाही. आई घरकाम करते. ऑनलाईन शिक्षणासाठी आईने तिला मोबाईल घेऊन दिला. मोबाईलद्वारे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. अभ्यासाऐवजी ती त्याच्याशी बोलायची. त्याने रंगबेरंगी स्वप्न तिला दाखविली. सोमवारी तिने घरातून पळ काढला.
४) ती अवघी १५ वर्षाची. शिक्षणाच्या नावावर मोबाईल तिच्या हाती आला. ती स्वच्छंदी झाली. २६ वर्षाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गैरप्रकार झाले. लग्न होऊ शकत नसल्याने त्या दोघांनीही आत्महत्या केली.
५) ती १७ वर्षाची. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली तिला मोबाईल घेऊन दिला. घरच्यांनीही अभ्यास करते म्हणून लक्ष दिले नाही. ती एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गर्भवती झाली.
- पालकांची चिंता वाढली
या पाचही घटना अतिशय सामान्य घरातील मुलींच्या बाबतीत घडल्या आहे. मोलमजुरी करणारे मायबाप मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करून साधनं घेऊन देतात. पण विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करून भलत्याच मार्गाला लागतात. या घटनांच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहे. तर काही तक्रारी शाळांकडे आल्या आहेत. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.
राजश्री उखरे, प्राचार्य
- आज शिक्षणाला दुसरा पर्याय उपलब्ध नाही. याचा अर्थ मुलांनी दुरुपयोग करावा असाही नाही. मुलांना खरे तर समजवून घ्यायला पाहिजे. पालकांनीही त्याची जाणिव करून द्यायला हवी. शिक्षकांनीही गैरप्रकारचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगायला हवे. ऑनलाईनमुळे ज्या तक्रारी येत आहे. त्या चुकीच्या आहे.
भाग्यश्री अणे, प्राचार्य