शक्ती-अहिंसकची आॅनलाईन शिक्षण क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:34 AM2017-11-06T01:34:41+5:302017-11-06T01:34:58+5:30

दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना अनेक प्रकारचे संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात असतात. हीच अवस्था स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतही असते.

The Online Learning Revolution of Non-Violence | शक्ती-अहिंसकची आॅनलाईन शिक्षण क्रांती

शक्ती-अहिंसकची आॅनलाईन शिक्षण क्रांती

Next
ठळक मुद्देदोन भावंडांची संकल्पना : तयार केला ‘ शिक्षा अ‍ॅप’, तीन भाषेत शैक्षणिक मार्गदर्शन

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना अनेक प्रकारचे संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात असतात. हीच अवस्था स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतही असते. मुलांना योग्य सल्ला आणि माहिती मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर शहरात राहण्या- खाण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता, नागपूरच्या शक्ती आणि अहिंसक चव्हाण या दोन भावंडांनी ‘शिक्षा अ‍ॅप’ विकसित केला आहे. गुगलने याला मान्यता देऊन सर्वसामान्यांसाठी प्ले स्टोअरवर हा अ‍ॅप उपलब्ध केला आहे.
कपिलनगर येथे राहणाºया शक्ती आणि अहिंसक या दोन भावंडांच्या जिद्दीतून आॅनलाईन शिक्षणाच्या संकल्पनेत एक नवीन क्रांती उदयास आली आहे. वडील शिर्शानंद चव्हाण हे जिल्हा ग्रंथालयात नोकरीवर आहेत. शक्तीने बीबीए व कॉम्प्युटरचा कोर्स केला तर अहिंसकने बी.कॉम. पूर्ण केले. शक्तीने स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेतून भारतीय सैन्यात क्लरीकल विभागात नोकरी प्राप्त केली. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आलेल्या अडचणींची त्याला कल्पना होती. या अडचणी दूर करण्याची जिद्द त्याच्या मनात निर्माण झाली आणि वर्षभरात नोकरी सोडून त्याने ‘शिक्षा अ‍ॅप’ विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केली. या प्रकल्पात त्याला लहान भाऊ अहिसंकची मदत मिळाली. त्यांच्या मेहनतीतून एक कंपनी निर्माण झाली व यातून दीड वर्ष मेहनत घेत हा अ‍ॅप विकसित केला.
विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत माहिती देणारे अनेक वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र चव्हाण बंधूंच्या शिक्षा अ‍ॅपमध्ये वेगळी विशेषता आहे. सर्वांना सहज आकलन होईल यासाठी त्यांनी हे अ‍ॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेत तयार केले आहे. हे अ‍ॅप अगदी नि:शुल्क उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी घरबसल्या या अ‍ॅपमधून अभ्यास करू शकेल, असा विश्वास चव्हाण बंधूंनी व्यक्त केला. सध्या या अ‍ॅपवर यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांची माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. पोलीस भरती, तलाठी किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारे कदाचित हे पहिले अ‍ॅप असेल, असा दावा शक्तीने केला. आवश्यक कोर्स, अभ्यासक्रम, पुस्तकांसह व्हिडीओ कौन्सिलिंग, तज्ज्ञ शिक्षकांद्वारे व्हिडीओ मार्गदर्शन या अ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. सामान्य ज्ञानापासून परीक्षांबाबतची माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे.
हे अ‍ॅप तयार करण्यासाठी लाखोंचा खर्च आला. प्रसंगी घर गहाण ठेवावे लागले. यावेळी मित्र, नातेवाईकांनी मोठी मदत केली. अनेक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणींवर मात करून हे अ‍ॅप विकसित करण्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर आहे. एक कंपनी स्थापन करून ४५ लोकांच्या टीमद्वारे या अ‍ॅपचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्रोत मानणाºया शक्ती व अहिंसकने बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनाला अ‍ॅप समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.

तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
अ‍ॅपमधील अपडेट्स आणि अ‍ॅनिमेशनसह व्हिडीओद्वारे शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे काम होते. यासाठी त्यांनी जवळपास ६०० शिक्षकांची मुलाखत घेतली. त्यापैकी ५ ते २५ वर्षांचा अनुभव असलेल्या विविध विषयांतील तज्ज्ञ अशा ५० ते ६० शिक्षकांची निवड केली. त्यांच्या मार्गदर्शनाचे व्हिडीओ शूट करून ते अपलोड केले. यामध्ये नियमित बदल करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षा अ‍ॅप वेबसाईटवरही उपलब्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह आॅनलाईन टेस्टची व्यवस्थाही योग्य सोल्यूशनसह यामध्ये उपलब्ध आहे.
भविष्यात बरेच काही
सध्या केवळ स्पर्धा परीक्षांची माहिती व मार्गदर्शन अ‍ॅपवर उपलब्ध आहे. मात्र लवकरच यामध्ये दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमासह जेईई, एआयपीएमटी, एआय ट्रिपल ई, डिफेन्स सेवेत जाणाºयांसाठी एनडीए आदी सर्व परीक्षा आणि अभ्यासक्रमांची माहिती आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शक्ती याने स्पष्ट केले.

Web Title: The Online Learning Revolution of Non-Violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.