‘ऑनलाईन’-‘ऑफलाईन’चा घोळ संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:24+5:302021-02-10T04:08:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या परीक्षा ‘ॲनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा ‘मिक्स मोड’मध्ये घेण्यात याव्यात, असा विद्वत् परिषदेचा सूर आहे. त्यामुळे नेमक्या परीक्षा कशा पद्धतीने होणार, यासंदर्भात अद्यापही संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिक्स मोड’पद्धतीनेच परीक्षा आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
परीक्षा कशा घ्यायचा याचा निर्णय विद्यापीठांना घ्यायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागील आठवड्यात नागपुरात दिली होती. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनीदेखील ‘मिक्स मोड’नेच परीक्षा होतील, असे सांगितले होते. ‘कोरोना’मुळे लांबलेल्या उन्हाळी परीक्षा विद्यापीठाने ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या होत्या. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात. तेथे इंटरनेट, स्मार्टफोन अशा सुविधा नसल्याने त्यांची अडचण होते. त्यामुळे सर्वांना परीक्षेची संधी मिळावी यासाठी ‘मिक्स मोड’साठी विद्यापीठाचा आग्रह आहे.
मंगळवारी विद्वत् परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा झाली. ‘ऑनलाईन’ परीक्षा तर होतीलच, मात्र सोबतच विद्यार्थ्यांना ‘ऑफलाईन’चा पर्यायदेखील खुला ठेवावा, असा बैठकीतील सूर होता. विद्यार्थ्यांचे एकूण हित लक्षात घेता ‘मिक्स मोड’नेच परीक्षेचे आयोजन करण्यावर आमचा भर असेल. यासंदर्भात विद्वत् परिषदेच्या बैठकीत प्रस्तावदेखील संमत झाला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी दिली.
‘स्पेशल टास्क कमिटी’ ठरविणार नियोजन
दरम्यान, परीक्षांचे नियोजन करण्यासाठी ‘स्पेशल टास्क कमिटी’ गठित करण्यात आली आहे. ही समिती परीक्षेच्या नियोजनासोबतच एकूण आराखडा तयार करेल. त्यानंतर संबंधित प्रस्ताव व्यवस्थापन परिषद व अभ्यास मंडळांसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.