खूशखबर! आरटीई अंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
By गणेश हुड | Published: April 16, 2024 05:24 PM2024-04-16T17:24:08+5:302024-04-16T17:24:50+5:30
जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश.
गणेश हूड, नागपूर : समजातील आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणहक्क कायदा (आरटीई) करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात या कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी याबाबतचे आदेश पारित केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमअंतर्गत आरटीईअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना २७ मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ६१९ शाळांची नोंदणी करण्यात आली. आरटीई प्रवेशाबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत सोमवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ ते ३० एप्रिल या कालावधीत सुरू होणार आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पालकांची चिंता वाढली होती.
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. यात ३१ डिसेंबर २०२४ रोजी किमान वय ६ वर्षे असावे. कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस असावे, असे स्पष्ट केले आहे.