पाठ्यपुस्तकांशिवाय सुरू आहे ऑनलाईन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:16+5:302021-07-14T04:10:16+5:30

जिल्ह्यात ७० टक्के झाला पुरवठा; पण विद्यार्थ्यांच्या हातात नाही पोहचले पाठ्यपुस्तक नागपूर : ऑनलाईन शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने ...

Online school is started without textbooks | पाठ्यपुस्तकांशिवाय सुरू आहे ऑनलाईन शाळा

पाठ्यपुस्तकांशिवाय सुरू आहे ऑनलाईन शाळा

Next

जिल्ह्यात ७० टक्के झाला पुरवठा; पण विद्यार्थ्यांच्या हातात नाही पोहचले पाठ्यपुस्तक

नागपूर : ऑनलाईन शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. पण पुस्तके मात्र अजूनही विद्यार्थ्यांच्या हाती पडली नाही. शिक्षण विभागाने जिल्ह्यात ७० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाल्याचे सांगितले आहे. पण विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडायला आणखी बराच वेळ आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांशिवायच सुरू आहे ऑनलाईन शाळा असेच म्हणावे लागेल.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास १५३० शाळा तर महापालिकेच्या शहरात १५६ वर शाळा आहेत तर अनुदानित अशा एक हजारावर शाळा शहर व ग्रामीण भागात आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची डिमांड बालभारतीकडे गेल्या अनेक दिवसापूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. परंतु यंदा शाळा सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतरही पाठ्यपुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना झाले नाही.

- तालुकानिहाय विद्यार्थी व पुस्तकांची मागणी

तालुका विद्यार्थी पुस्तके

नागपूर ग्रामीण १४८३२ ७३६८३

उमरेड ११५७४ ६३५७५

भिवापूर ६७८५ ३४६८०

कुही १००१४ ५९८४६

रामटेक १३०७१ ६९६७९

मौदा १००८२ ५७०८०

पारशिवनी ९९६८ ४८९७५

काटोल ११५९४ ५८०१८

नरखेड ९८८९ ५३१७७

सावनेर १२७४६ ७१४२८

कळमेश्वर ८३९२ ४७१७०

कामठी १५७९४ ८६४१३

हिंगणा १५२०० ८२३०१

- १८ टक्के मुलांनीच परत केली पुस्तके

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदाची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. जिल्ह्यातून १८ टक्केच्या जवळपास पालकांनी पुस्तके परत केली.

- जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेड, सावनेर तालुक्यात पुस्तकांच्या मागणीच्या तुलनेत ७० टक्के पुरवठा झाला आहे. एक दोन दिवसात नागपूर व हिंगणा तालुक्यातही पुस्तकांचा पुरवठा होईल. अजून केंद्र शाळांवर पुस्तके पोहचली नाही. विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर पुस्तके द्यायची की विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तके नेऊन द्यायची हा निर्णय अद्याप व्हायचा आहे.

- प्रमोद वानखेडे, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान, जि.प.नागपूर

Web Title: Online school is started without textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.