आॅनलाईन सातबारा यंत्रणा ठप्प शेतकऱ्यांवर भुर्दंड : ग्रामीण तहसील कार्यालयातील प्रकार
By admin | Published: February 27, 2016 03:31 AM2016-02-27T03:31:35+5:302016-02-27T03:31:35+5:30
शेतकऱ्यांना सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले
नागपूर : शेतकऱ्यांना सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले. परंतु नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयातील आॅनलाईन सातबारा यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प पडली आहे. याचा भुर्दंड मात्र दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांवर पडत आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एका दिवसात सातबारा मिळत असल्याने शेतकरी याचा चांगला लाभ घेत आहेत. नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सुद्धा ही यंत्रणा कार्यरत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. शेतकरी ग्रामीण तहसील कार्यालयात येत आहेत, आणि त्यांना यंत्रणा बंद पडल्याचे कारण सांगून बाहेर पाठविले जात आहे. बाहेरून आॅनलाईन अर्ज भरून आणल्यावर तहसील कार्यालयात सही शिक्का दिला जातो. परंतु यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.
तहसील कार्यालयात केवळ २३ रुपये भरून आॅनलाईन सातबारा उपलब्ध होतो. सध्या ही यंत्रणा ठप्प आहे. कार्यालयाबाहेर मात्र आॅनलाईन सातबारा अर्ज तयार करून दिले जात आहे. एका व्हॅनमध्ये झेरॉक्स मशीनसह आॅनलाईन सातबारासह सर्व सुविधा उपलब्ध आहे. तहसील कार्यालयात आलेल्या शेतकऱ्याला बाहेर अशी सुविधा उपलब्ध असल्याचे कार्यालयातूनही सांगितले जाते. शेतकरी सुद्धा गावी परत जाण्याऐवजी त्याचा लाभ घेण्याचा निर्णय घेतो. यात त्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. आॅनलाईन अर्ज करून देण्यासाठी ६० रुपये घेतले जातात. एखाद्या दलालाच्या हाती लागले तर तो १५० ते २०० रुपये सांगतो. अशा प्रकारे २३ रुपयाऐवजी शेतकऱ्यांना १५० ते २०० रुपये खर्च करावे लागत आहे.(प्रतिनिधी)