सेवानिवृत्त झालेल्यांना दिला जातोय ऑनलाईन निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:34 AM2020-05-13T09:34:45+5:302020-05-13T09:35:06+5:30
लॉकडाऊनच्या काळात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाहीर निरोप समारंभावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या या कर्मचाऱ्यांना महावितरण ऑनलाईन निरोप देत आहे.
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाहीर निरोप समारंभावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या या कर्मचाऱ्यांना महावितरण ऑनलाईन निरोप देत आहे.
देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. मार्च व एप्रिल महिन्यात महावितरणचे २९६ अभियंता अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यात नागपूर जिल्ह्याच्या १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प ठेवण्यात आली आहे. वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता, त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. दरम्यान २९६ कर्मचारी निवृत्त झाले. सध्याच्या वातावरणामुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देता आला नाही. मात्र कंपनीने या कर्मचाऱ्यांची जाणीव ठेवली. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर व त्यांच्या टीमने व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा उल्लेख करीत सर्वांचे आभार मानले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सर्व संचालकांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. सध्या हा व्हिडिओ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावूक करीत आहे. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी आम्हाला चार भिंतीआड निरोप दिला जात होता. पण आता संपूर्ण कंपनी या समारंभात सहभागी होत आहे. कंपनीने स्पष्ट केले की, लॉकडाऊन नंतर सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला जाईल.
- पाच हजार रुपयांचा निधी
कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून ठेवते. यातून कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही सन्मानित करण्यात येते. ग्रॅज्युटी व पीएफची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.
- सेनेतून मिळाली प्रेरणा
महावितरणचे निदेशक (एचआर) ब्रिगेडीअर पवन गंजू हे सेनेतून निवृत्त झाल्यानंतर महावितरणमध्ये कार्यरत आहे. सेनेमध्ये या प्रकारचे उपक्रम राबविले जातात. महावितरणने सेनेकडूनच प्रेरणा घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.