नागपुरात ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 08:43 PM2019-02-01T20:43:42+5:302019-02-01T22:03:50+5:30
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कविता ऊर्फ कवि जाधव दलाल महिलेला अटक करून पोलिसांनी तिच्याकडे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, जाधव नामक ही महिला दलाल आंबटशौकिन ग्राहकांना वारांगनांची ऑनलाईन सेवा देताना कमालीची सतर्कता बाळगत होती. एकिकडे पैसे घ्यायचे, दुसरीकडे वारांगनांची डिलिव्हरी द्यायची आणि तिसरीकडे कुंटणखाना चालवायचा, अशी कविताची पद्धत या कारवाईनंतर पुढे आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कविता ऊर्फ कवि जाधव दलाल महिलेला अटक करून पोलिसांनी तिच्याकडे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, जाधव नामक ही महिला दलाल आंबटशौकिन ग्राहकांना वारांगनांची ऑनलाईन सेवा देताना कमालीची सतर्कता बाळगत होती. एकिकडे पैसे घ्यायचे, दुसरीकडे वारांगनांची डिलिव्हरी द्यायची आणि तिसरीकडे कुंटणखाना चालवायचा, अशी कविताची पद्धत या कारवाईनंतर पुढे आली.
विविध ठिकाणच्या मुली आणि महिलांची सेवा ज्यांना हवी आहे, त्यांनी संपर्क करावा म्हणून एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली जाधव हिने आपला संपर्क नंबर दिला होता. या नंबरवर संपर्क करणाऱ्या धनिक मंडळी आणि आंबटशौकिनांना ती महिला, मुलींचे व्हॉटस्अॅपवर फोटो पाठवायची. त्यातील ज्या महिला-मुलीची निवड करण्यात आली, त्या महिला मुलीचे एका तासासाठी विशिष्ट दर ती फोनवरच ग्राहकाला कळवायची. ग्राहकाने संबंधित रक्कम विशिष्ट पद्धतीने दलालाकडे दिल्यानंतर त्याला ती दलालामार्फत विशिष्ट ठिकाणी बोलवायची. तेथे ग्राहकाला संबंधित तरुणी किंवा महिला द्यायची आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी (सदनिकेत) पाठवायचे, अशी कविता जाधव आणि तिच्या दलालाची कार्यपद्धती आहे.
परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांना त्याची माहिती कळाल्याने त्यांनी या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, पोलिसांतर्फे बनावट ग्राहकाने कवितासोबत संपर्क केला. तिने ग्राहकाला सहा हजार रुपयात वारांगना उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास बनावट ग्राहक कविताने सांगितलेल्या नंदनवनमधील केडीके कॉलेजजवळ पोहचला. तेथे दलालाने सहा हजार रुपये घेतल्यानंतर त्याला एक तरुणी सोपवली. ग्राहकाने त्याला आणखी दोन तरुणींची मागणी केली असता त्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पॉश सदनिकेत मिळेल असे सांगितले. त्यानुसार, ग्राहक आणि दलाल त्या सदनिकेत पोहचले. तेथे दोन वारांगना होत्या. पोलिसांनी छापामारी करून त्या वारांगना, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी कविता जाधव आणि तिच्यासाठी दलालाचे काम करणारे दोन आरोपी अशा सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य आणि मोबाईल जप्त केले.
६० महिला-मुलींचे फोटो
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कविता आणि तिच्यासारख्यांनी विरळ वस्तीत सदनिका भाड्याने घेऊन ठेवल्या आहेत. तेथे त्या वेश्याव्यवसाय करतात. कविताच्या सदनिकेचा पोलिसांना छडा लागला असून, तिला नंदनवन पोलिसांनी अटक केली. तिच्या मोबाईलमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या ६० महिला-मुलींचे फोटो आढळले आहे.
पोलिसांची दोन तास धावपळ
पोलिसांनी नाट्यमयरीत्या पकडलेल्या या सेक्स रॅकेटची मुख्य सूत्रधार कविता ऊर्फ दुर्गा गजानन जाधव (वय ३५) ही मूळची रामनगर वर्धा येथील रहिवासी आहे. ती सध्या नागपुरात राहते. सुजीतकुमार सत्यप्रसाद (वय २९) आणि सोनू गुलशन यादव (वय ३२) यांच्या माध्यमातून ती सेक्स रॅकेट संचालित करते. अनेक वर्षांपासून ती या गोरखधंद्यात सक्रिय असल्याचे समजते. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील मनोज टेकाम, राहुल वानखेडे आणि देवेंद्र नवघरे यांनी तिला आणि तिच्या साथीदारांना गजाआड करण्याची कामगिरी बजावली. तिला पकडण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन तास इकडे तिकडे धावपळ करावी लागली. कविता, सुजीत आणि सोनूविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.