दीड टक्केच बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:42+5:302021-03-23T04:07:42+5:30
लाभ मात्र मात्र १,९५६ कामगारांनाच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी ...
लाभ मात्र मात्र १,९५६ कामगारांनाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेल्या १ लाख ३१ हजार २५८ कामगारांपैकी फक्त १ हजार ९५६ कामगारांनाच विविध योजनांचा लाभ मिळाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. लाभार्थींची ही टक्केवारी केवळ १.४९ टक्के एवढी आहे. परिणामी, कामगार कल्याणाच्या योजनांपासून हजारो कामगार वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे.
युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांबाबत कामगार विभागाकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. त्याद्वारे प्राप्त माहितीतून मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या २९ योजनांची वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. राज्य सरकारच्या कामगार कल्याणाच्या अनेक योजना ठप्प असून, सुरू असलेल्या योजनातूनही अत्यल्प कामगारांनाच लाभ मिळत आहे.
२९ योजनांपैकी ७ योजना कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, ६ आरोग्य सहाय्य, ७ आर्थिक सहाय्य तर ६ सामाजिक सुरक्षा सहाय्य योजना आहेत. महाराष्ट्रात १८ लाख ७५ हजार २६८ नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. सन २०२० मध्ये नागपूर जिल्ह्यात या नोंदणीकृत कामगारांची संख्या १ लाख ३१ हजार २५८ होती, त्यापैकी फक्त १ हजार ९५६ कामगारांनाच १ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. मंडळाच्या २९ पैकी ११ योजनेतून नागपूर जिल्ह्यात एकाही कामगारास लाभ मिळाला नसल्याचे या माहितीतून उघडकीस आले आहे.
मंडळात नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाखांची आर्थिक मदत देण्याच्या योजनेतून फक्त दोनच लाभार्थी ठरले आहेत. तर नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास २ लाखांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेतून १८ लोकांनाच मदत मिळाली आहे. गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाखांची वैद्यकीय मदत देण्याच्या योजनेतून २० लोकांनाच मदत मिळाली आहे. कामगाराच्या २ पाल्यांना १० व १२ वीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त झाल्यास १० हजार एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य करण्याच्या योजनेतून फक्त २५ पाल्यांनाच निधी देण्यात आला आहे. नोंदीत कामगाराच्या संगणकाचे शिक्षण घेत असलेल्या दोन पाल्यांना शुल्काची प्रतिपूर्ती करण्याच्या योजनेचे फक्त सहाच लाभार्थी ठरले आहेत.
शैक्षणिक सहाय्याच्या ७ योजनेतून १४२५ कामगार पाल्यांना लाभ मिळाला. आरोग्य सहाय्याच्या ६ योजनांपैकी दोन योजनांचाच १२९ लाभार्थींना लाभ मिळाला आहे. आर्थिक सहाय्याच्या ७ योजनांपैकी ४ योजनांमधून ८५ कामगारांना लाभ मिळाला असून, सामाजिक सहाय्याच्या ६ योजनांपैकी २ योजनांचाच लाभ ३१६ कामगारांना मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १९५६ बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचे लाभार्थी ठरले असून, त्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा ३ कोटी १६ लाख १७ हजार ९०० रुपये इतका निधी खर्च झाला आहे.
कोट
कोट्यवधीचा निधी अखर्चिक पडून
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधीचा निधी असतानाही तो लाभार्थ्यांवर खर्च होत नसल्याचे यातून दिसून येते. हा कोट्यवधीचा निधी मंडळाकडे अखर्चिक पडून आहे, या निधीतून हजारो कामगारांना योजनांचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी मंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
-अनिल वासनिक, संयोजक, शहर विकास मंच