दोन महिन्यांत केवळ १५ स्मार्ट ट्रॅफिक बूथ लागले; १३५ लावण्यासाठी किती वेळ लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 08:10 AM2023-05-25T08:10:00+5:302023-05-25T08:10:02+5:30
Nagpur News उपराजधानीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १५० स्मार्ट ट्रॅफिक बूथ लावण्यात येणार आहेत. परंतु, दोन महिन्यांत केवळ १५ बूथ लागले आहेत. त्यामुळे उर्वरित १३५ बूथ लावण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
फहीम खान
नागपूर : उपराजधानीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १५० स्मार्ट ट्रॅफिक बूथ लावण्यात येणार आहेत. परंतु, दोन महिन्यांत केवळ १५ बूथ लागले आहेत. त्यामुळे उर्वरित १३५ बूथ लावण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच, वर्धा रोडवरील गर्दीच्या चौकांना हे बूथ देण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाच्या उपयोगितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सुरुवातीस नागपूरला १२ बूथ मिळाले होते. ते बुथ लावण्यासाठी दीड महिना विलंब झाला. परिणामी, बूथ धूळखात पडले होते. हा स्मार्ट सिटीचा प्रकल्प असला तरी, कामात स्मार्टपणा नसल्याचे दिसून येत आहे. हे बूथ पावसाळा व हिवाळ्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या फायद्याचे ठरतील. त्याकरिता, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व बूथ लावले गेले पाहिजे, असे जुन्याजाणत्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दाराला डिजिटल कोड
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बूथच्या दाराला डिजिटल कोड यंत्र लावण्यात आले आहे. विशिष्ट कोड नमूद केल्यानंतरच दार उघडणार आहे. वीज पुरवठ्यासाठी बूथवर सोलर प्लेट लावण्यात आली आहे. तसेच, बूथला सेन्सर आहे. दार लॉक केल्यानंतर बूथमधील पंखे, माईक, लाईट व इतर उपकरणे आपोआप बंद होतील.
जोधपूरची कंपनी उत्पादक
हे बूथ बंगळुरूच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहेत. जोधपूर येथील कंपनीने बूथ तयार केले आहेत. प्रत्येक बूथची किंमत पाच लाख रुपये असल्याची माहिती जाणकारांनी दिली. बूथच्या आत दोन वाहतूक पोलिस बसण्याची व्यवस्था आहे. बाहेरच्या तुलनेत आतील तापमान २-३ डिग्रीने कमी राहील, अशी बूथची रचना करण्यात आली आहे. वाहनचालकांना निर्देश देण्यासाठी माईक आहे.
केवळ १५ बूथ मिळाले
वाहतूक विभागाला आतापर्यंत केवळ १५ बूथ मिळाले आहेत. उर्वरित बूथ लवकरच मिळतील, अशी आशा आहे. लावलेले बूथ वापरण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
-चेतना तिडके, वाहतूक पोलिस उपायुक्त.